महेश मांजरेकरांचा मुलगा सत्याची 'वेडात मराठे वीर दौडले सात'मधून एक्झिट?, या व्हिडीओमुळे चर्चांना उधाण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 05:58 PM2023-03-18T17:58:02+5:302023-03-18T17:58:45+5:30
महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) दिग्दर्शित 'वेडात मराठे वीर दौडले सात' (Vedat Marathe Veer Daudale Saat) हा आगामी चित्रपट २०२३च्या दिवाळीला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) दिग्दर्शित 'वेडात मराठे वीर दौडले सात' (Vedat Marathe Veer Daudale Saat) हा आगामी चित्रपट २०२३च्या दिवाळीला प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट हिंदी आणि मराठी अशा दोन भाषेत रिलीज करण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या लॉन्च सोहळ्यात हे सात वीर कोण असणार याची झलक दाखवण्यात आली होती. यात महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकर (Satya Manjarekar) देखील एक महत्वाची भूमिका साकारणार असे समोर आले होते. मात्र आता या चित्रपटाबद्दल एक नवीन माहिती समोर आली आहे. महेश मांजरेकर यांनी स्वत:चा मुलगा सत्या मांजरेकरला या चित्रपटातून काढून टाकल्याचे बोलले जात आहे.
सत्या हा महेश मांजरेकर यांचा मुलगा आहे. महेश मांजरेकर यांनी आपल्या मुलांना चित्रपटातून लॉन्च केले आहे. सत्याने याअगोदर सुद्धा मराठी चित्रपटातून काम केले होते. मात्र छत्रपतींचा मावळा म्हणून तो या भूमिकेत शोभत नाही त्याला ही भूमिका देऊ नये असा कडाडून विरोध झाला. या विरोधामुळे महेश मांजरेकर यांनी आपल्या मुलाला चित्रपटातून काढून टाकले अशी चर्चा सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. याला एक कारण देखील आहे.
वेडात मराठे वीर दौडले सात या चित्रपटात सात मावळे महेश मांजरेकर यांनी अगोदर प्रेक्षकांच्या समोर आणले होते. त्यात सत्या मांजरेकर, विशाल निकम, जय दुधाने, प्रवीण तरडे, हार्दिक जोशी, उत्कर्ष शिंदे आणि विराट मडके या सात कलाकारांचा समावेश होता. मात्र सध्या चित्रपटाच्या निमित्ताने ही कलाकार मंडळी जिममध्ये वर्कआउट करताना दिसली आहेत. यात सत्या मांजरेकर कुठेच वर्कआउट करताना दिसला नाही.
अभिनेता आरोह वेलणकरने त्याच्या इंस्टा स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ‘टीम वर्क’ असे म्हणत त्याने सर्व कलाकारांचे वर्कआऊट मोबाईलमध्ये कॅपचर केले. त्यात सत्या मांजरेकर कुठेच दिसला नसल्याने आता ही भूमिका आरोह वेलणकर साकारणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. हा व्हिडीओ पाहून सत्याला चित्रपटातून काढून टाकण्यात आले का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याच्याजागी आरोहची वर्णी लागली आहे का? हे येत्या काही दिवसातच स्पष्ट होईल. खरेतर सत्याने एका नव्या इनिंगला सुरुवात करत आहे. सत्याने नुकतेच हॉटेल व्यवसाय क्षेत्रात पाऊल टाकले आहे. सुका सुखी या नावाने त्याने हॉटेल व्यवसाय क्षेत्रात एन्ट्री घेतली आहे.