सिनेमा पाहणारा माणूस! अशोक राणे यांना यंदाचा 'सत्यजित राय स्मृती पुरस्कार' जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 11:39 AM2023-05-05T11:39:13+5:302023-05-05T11:39:53+5:30
Ashok rane: अशोक राणे यांना' सत्यजित राय स्मृती पुरस्कार ' जाहीर झाला असून पहिल्यांदाच एका मराठी लेखकाला हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.
ज्येष्ठ चित्रपट-समीक्षक आणि अभ्यासक अशोक राणे (ashok rane) यांना यंदाचा ' सत्यजित राय स्मृती पुरस्कार ' जाहीर झाला आहे. 'फिप्रेस्की इंडिया' या आंतरराष्ट्रीय संस्थेतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो. सिनेमासंदर्भातलं उत्तमोत्तम लेखन करणाऱ्या लेखकाला हा पुरस्कार दिला जातो. यापूर्वी अरुणा वासुदेव (2021), प्रो. शनमुगदास (2022) यांना सत्यजित रे पुरस्कार देण्यात आला आहे. अशोक राणे हे गेली 46 वर्ष सिनेमा संदर्भात लेखन करत आहेत. त्यांना या लेखनासाठी आजवर तीनदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. असा पुरस्कार मिळवणारे ते मराठीतले एकमेव लेखक आहेत.
गेली 46 वर्षे मराठीतील सर्व मान्यवर वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांमधून सातत्याने चित्रपट समीक्षा लेखन करत आलेले अशोक राणे हे हा पुरस्कार प्राप्त करणारे पहिलेच मराठी चित्रपट समीक्षक आहेत. मराठीतून जागतिक सिनेमावर त्यांनी आजवर विपुल प्रमाणात लेखन केले आहे. याशिवाय त्यांनी इंग्रजीतूनही बरेच लेखन केले आहे. चित्रपट समीक्षा लेखनाच्या क्षेत्रात त्यांनी स्वतःचा वेगळा ठसा आणि ओळख निर्माण केली आहे. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणारेही ते मराठीतील पहिलेच चित्रपट समीक्षक आहेत.
1995 ला सिनेमाची चित्रकथा या पुस्तकासाठी अशोक राणे यांना पहिल्यांदा सिनेमा लेखनासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 2003 ला सर्वोत्कृष्ट सिने-समीक्षक म्हणून आणि सिनेमा पाहणारा माणूस या त्यांच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकासाठी ही राष्ट्रीय पुरस्कार असा तीनदा राष्ट्रीय पातळीवर त्यांचा गौरव झालेला आहे.
असा सुरु झाला अशोक राणे यांचा फिल्मी प्रवास
1984 मध्ये त्यांनी पुण्याच्या एफटीआयआयमधून फिल्म अप्रेशिएशन कोर्स केला. त्यानंतर सिनेमा सोप्या भाषेत सर्व महाराष्ट्राला समजला पाहिजे यासाठी कार्यक्रम हाती घेतला. स्वखर्चाने महाराष्ट्रातल्या 25 शहरांमध्ये त्यांनी सिनेमाचे वर्कशॉप आयोजित केले होते. तेव्हापासून सुरु झालेली त्याची सिनेमाची कार्यशाळा अजूनही सुरु आहे.
अशोक राणे यांची साहित्य संपदा
सिनेमाची चित्रकथा (1995 ), चित्र मनातले (१९९६), अनुभव (1997), चित्रपट एक प्रवास (2001) ,सख्ये सोबती (2003), व्ह्यूस एन्ड थॉट्स ऑन स्क्रीप्ट रायटींग (2006), मोन्ताज (2015) आणि सिनेमा पाहणारा माणूस (2019) अशी अशोक राणे यांची साहित्य संपदा आहे.
याशिवाय अशोक राणे यांनी एकूण 8 माहितीपट केले आहेत. त्यासाठी त्यांना दोन आंतरराष्ट्रीय पारितोषिके प्राप्त झाली आहेत. चित्रपट रसास्वाद शिबिरांच्या, तसेच महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांतून महाविद्यालयातून चित्रपट विषयक केलेल्या अध्यापनातूनही चित्रपट माध्यम विषयक विचार गांभीर्यानं करायला तरुण पिढीला सातत्याने उद्युक्त करण्याचे काम ते करत आले आहेत.