मैथिली पटवर्धन आणि साहिल जोशीच्या मस्तीने आणली 'पिप्सी'च्या सेटवर जान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 05:19 PM2018-07-23T17:19:42+5:302018-07-23T17:20:39+5:30

सौरभ भावे लिखित आणि रोहन देशपांडे दिग्दर्शित 'पिप्सी' सिनेमाचे चित्रीकरण यवतमाळ येथील आर्णी तालुक्यात ऐन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये झाले होते. त्यामुळे संपूर्ण युनिटला चिअर-अप करण्याची जबाबदारी मैथिली आणि साहिलने आपल्या खांद्यावर घेतली होती.

Manithi Patwardhan and Sahil Joshi's 'Pipsy' set of life | मैथिली पटवर्धन आणि साहिल जोशीच्या मस्तीने आणली 'पिप्सी'च्या सेटवर जान

मैथिली पटवर्धन आणि साहिल जोशीच्या मस्तीने आणली 'पिप्सी'च्या सेटवर जान

googlenewsNext

लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधी कासलीवाल प्रस्तुत आणि निर्मित 'पिप्सी' सिनेमा येत्या २७ जुलैला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात प्रमुख भूमिकेत असलेल्या मैथिली पटवर्धन आणि साहिल जोशी या बालकलाकारांच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुकदेखील होत आहे. या सिनेमातील 'चानी' आणि 'बाळू' व्यक्तिरेखेसारखीच ही दोघे चांगले मित्र असून वास्तविक आयुष्यातदेखील ती प्रामाणिक, हुशार आणि तितकेच मस्तीखोर देखील आहेत. 'पिप्सी' सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान या दोघांनी सेटवर खूप धम्माल मस्ती केली असल्याचे समजते. 
सौरभ भावे लिखित आणि रोहन देशपांडे दिग्दर्शित 'पिप्सी' सिनेमाचे चित्रीकरण यवतमाळ येथील आर्णी तालुक्यात ऐन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये झाले होते. त्यामुळे संपूर्ण युनिटला चिअर-अप करण्याची जबाबदारी मैथिली आणि साहिलने आपल्या खांद्यावर घेतली होती. सेटवर ४० हून अधिक तापमान आणि पाणीटंचाई अशी भीषण परिस्थिती असतानादेखील मैथिली आणि साहिलने त्याचा परिणाम आपल्या कामावर पडू न देता आपापला अभिनय चोख बजावला. त्या दोघांची चिकाटी आणि खिलाडूवृत्ती पाहून सेटवरील सर्व सदस्यांनादेखील स्फुरण आले होते. प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत चित्रीकरण नियोजित वेळेत पूर्ण करण्यासाठी मैथिली आणि साहिलने घेतलेल्या पुढाकाराचे आज सर्वत्र कौतुक केले जात आहे. त्यांच्या या मेहनतीची दखल अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महोत्सवामध्ये घेण्यात आली आहे. मैथिली आणि साहिलच्या दर्जेदार अभिनयाची जोड असलेला हा सिनेमा महाराष्ट्राच्या प्रेक्षकांनादेखील आवडेल, अशी आशा आहे.
दर्जेदार कथानक आणि मांडणी असलेला हा सिनेमा चित्रपट महोत्सवांमध्ये आपली विशेष छाप पाडत आहे. यंदाच्या ५८ व्या झ्लीन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये या सिनेमाला विशेष ज्युरी पुरस्कार देण्यात आला असून, २०१८ सालच्या एन.आय.टी.टी.इ. इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्येदेखील आणि नुकत्याच पार पडलेल्या १३ व्या बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठीदेखील 'पिप्सी' चित्रपट झळकला आहे.  इतकेच नव्हे तर, गतवर्षीच्या मामी हाफ तिकीट सेक्शनमध्ये आणि स्माईल आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलच्या बाल आणि तरुण विभागातदेखील ‘पिप्सी’ सिनेमाची खास स्क्रीनिंग झाली होती. अश्याप्रकारे विविध चित्रपट महोत्सवामधून मैत्रीच्या नात्याची परिभाषा जगासमोर मांडणारा ‘पिप्सी’ सिनेमा, आता महाराष्ट्राच्या प्रेक्षकांनादेखील आपलेसे करण्यास येत आहे.

Web Title: Manithi Patwardhan and Sahil Joshi's 'Pipsy' set of life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.