निस्सिम प्रेमाची अनुभूती ‘मन उधाण वारा’ सिनेमा या तारखेला होणार प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2019 08:19 PM2019-10-08T20:19:57+5:302019-10-08T20:24:32+5:30

बिंदा आणि सरिता या दोघांच्या आयुष्याभोवती या चित्रपटाची मध्यवर्ती कथा फिरते.

Mann Udhaan Vaara Marathi Movie | निस्सिम प्रेमाची अनुभूती ‘मन उधाण वारा’ सिनेमा या तारखेला होणार प्रदर्शित

निस्सिम प्रेमाची अनुभूती ‘मन उधाण वारा’ सिनेमा या तारखेला होणार प्रदर्शित

googlenewsNext

 

प्रत्येकाचं आयुष्य हे वेगवेगळ्या अनुभवांतून जातं आणि आपली वाट निवडतं. सगळं सुरळीत असताना आयुष्य कधी कधी अशा वळणावर उभं करतं की, त्यातून मार्ग काढणं सहजी शक्य होत नाही. मात्र काहीजण आपला स्वतंत्र मार्ग काढत आयुष्याकडे बघण्याचा वेगळा दृष्टीकोन देऊन जातात. जगण्याचा संघर्ष आणि संवेदना यांचा परामर्श घेत प्रेमाचा आणि नात्याचा अनुबंध उलगडणारा मन उधाण वारा’ हा चित्रपट येत्या ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  सतीश कौशिक एंटरटेनमेंट प्रोडक्शन्स’ आणि ‘लोका एंटरटेनमेंट’ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच ‘पेन मुव्हीज्’चे जयंतीलाल गडा यांच्या प्रस्तुतीखाली येत असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर संजय मेमाणे यांनी केले आहे.

 

बिंदा आणि सरिता या दोघांच्या आयुष्याभोवती या चित्रपटाची मध्यवर्ती कथा फिरते. निसर्गरम्य कोकणातल्या एका छोट्याशा गावात घडणारी कथा तिथल्या सामान्य माणसाच्या आयुष्यातला छोट्या-मोठ्या आव्हानांचं सुंदर चित्रण करते. तिथली साधी माणसं, त्यांचा जीवनाकडे बघण्याचा पारदर्शी परंतू तितकाच उदात्त भाव आपल्याही मनाला भिडतो.

आयुष्यातल्या एखाद्या वळणावर समोर अडचणींचा डोंगर राहतो. मन अस्थिर होतं. जाणिवा अर्थहीन होतात. काय करावं? ते समजत नाही. अशाक्षणी अनेकजण कोलमडून पडतात. तर काही मोजकेच त्याला आत्मविश्वासाने, धैर्याने सामोरे जातात. अशांची गोष्ट हा चित्रपट चित्रीत करतो. या चित्रपटात मोनल गज्जर, रित्विज वैद्य या नव्या जोडीसह किशोर कदम, उत्तरा बावकर, सागर कारंडे, शर्वरी लोहकरे, डॉ.शरद भुताडिया, विनोद कुलकर्णी, भारती पाटील, वैभव राजाध्यक्ष, साक्षी गांधी, ज्युलिया मोने, अनुराधा अटलेकर या कलाकारांच्या ‘भूमिका आहेत.

वेगवेगळ्या पठडीतील चार गाणी या चित्रपटात आहेत. अजय गोगावले, आदर्श शिंदे, सोनू निगम, हर्षवर्धन वावरे, कस्तुरी वावरे, सतीश चक्रव्रती, अनिशा सायिका या गायकांनी ही गीते स्वरबद्ध केली असून अमितराज, हर्ष,करण, आदित्य (त्रीनिती ब्रोस) सतीश चक्रव्रती या संगीतकारांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे. निशांत कौशिक, अक्षय गडा, धवल गडा चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाची कथा प्रदीप कुरबा यांची असून पटकथा-संवाद सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी लिहिले आहेत. छायांकन मिलिंद जोग तर संकलन कृष्णत घार्गे यांचे आहे. ११ ऑक्टोबरला मन उधाण वारा सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

 

Web Title: Mann Udhaan Vaara Marathi Movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.