Laxmikant Berde :'..म्हणून मराठी सिनेमा चालत नाहीत'; लक्ष्मीकांत बेर्डेंनी सांगितलं होतं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 07:04 PM2023-05-17T19:04:25+5:302023-05-17T19:07:38+5:30
Laxmikant Berde: उत्तम अभिनयामुळे चर्चेत येणारे लक्ष्मीकांत बेर्डे त्यांच्या परखड आणि स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखले जायचे.
गेल्या कित्येक वर्षांपासून मराठी आणि हिंदी सिनेमा यांच्यात थिएटर मिळवण्यावरुन जणू काही एक प्रकारची स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेमध्ये मराठी सिनेमांना स्क्रीन न मिळणे हा खूप मोठा मुद्दा आहे. आतापर्यंत अनेक दर्जेदार मराठी सिनेमांचं प्राईम टाइम, सिनेमागृह वा शो न मिळाल्यामुळे नुकसान झालं आहे. यात गेल्या काही दिवसांपूर्वीच TDM सिनेमाच्या बाबतीत हाच मुद्दा घडला आणि पुन्हा एकदा मराठी सिनेमांना स्क्रीन मिळत नसल्याचा मुद्दा चर्चेत आला. सध्या याविषयी अनेक कलाकार, लेखक, दिग्दर्शक, निर्माते यांनी त्यांची मत मांडली आहेत. मात्र, खूप वर्षांपूर्वी अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde) यांनी मराठी सिनेमा का चालत नाहीत यामागचं कारण सांगितलं होतं. त्यांची ही मुलाखत सध्या पुन्हा नव्याने चर्चेत आली आहे.
उत्तम अभिनयामुळे चर्चेत येणारे लक्ष्मीकांत बेर्डे त्यांच्या परखड आणि स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखले जायचे. त्याकाळी त्यांनी दूरदर्शन वाहिनीला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी मराठी सिनेमा का चालत नाही यामागचं कारण सांगितलं.
"जर तुम्हाला मनापासून वाटत असेल की मराठी चित्रपट चालावा तर तुम्ही स्वत: थिएटरमध्ये या आणि मराठी चित्रपट पाहा. मराठी सिनेमा चालणं हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. ज्यावेळी एखादा साऊथचा सिनेमा प्रदर्शित होतो त्यावेळी तेथील प्रेक्षक त्या सिनेमाला प्रतिसाद देतो, ज्यामुळे त्या सिनेमांना प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे जोपर्यंत तुम्ही थिएटरमध्ये जाऊन मराठी सिनेमा पाहात नाही तोपर्यंत तो चालणारच नाही", असं मत लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मांडलं होतं.
दरम्यान, लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठी सिनेसृष्टीचा एक आख्खा काळ गाजवला आहे. 'अशी ही बनवाबनवी', 'एक होता विदूषक', 'धडाकेबाज', 'दे दणा दण', 'झपाटलेला' अशा काही त्यांच्या सिनेमांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. मात्र, उत्तम अभिनयशैली असलेल्या या अभिनेत्याने फार कमी वयात जगाचा निरोप घेतला.