Vinesh Phogat Disqualified : 'खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील कुणाची चूक...', विनेश फोगाटला अपात्र ठरवल्यानंतर अस्ताद काळेची पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 03:00 PM2024-08-07T15:00:33+5:302024-08-07T15:00:52+5:30
अभिनेता अस्ताद काळेने विनेशसाठी पोस्ट शेअर केली आहे.
Vinesh Phogat Disqualified : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला बुधवारी सकाळी मोठा धक्का बसला. महिलांच्या कुस्तीमध्ये अंतिम फेरी गाठणारी भारताची पहिली महिला कुस्तीपटू ठरलेल्या विनेश फोगाट (Vinesh Phogat) हिला वजनी गटापेक्षा अधिक वजन भरल्याने स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आलं आहे. या घटनेमुळे भारताचं स्पर्धेतील एक हक्काचं पदक हुकल्यानं देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अभिनेता अस्ताद काळेने (Aastad Kale) विनेशसाठी पोस्ट शेअर केली आहे.
अस्ताद काळेनेत्याच्या सोशल मीडियावर विनेशला अपात्र केल्याची पोस्ट शेअर केली आहे. त्याने लिहलं, "मला खात्री आहे की कुणीही निष्काळजीपणा केला नसेल. खुद्द खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमधील कुणाची चूक नसेल. ही एक प्रामाणिक चूक होती. निश्चित असलेलं एक पदक भारताने गमावलं आहे. विनेश ही स्पर्धा हरतेय. पण, तिने क्रीडा जगतामध्ये आणि तिच्या संपूर्ण देशात मिळालेला आदर कधीही गमावणार नाही", अशी पोस्ट आस्तादने विनेशसाठी केली आहे.
विनेशने जेव्हा अंतिम सामन्यात एन्ट्री घेतली होती. तेव्हाही तिच्यासाठी आस्तादने पोस्ट केली होती. "कुस्तीची लढत संपताक्षणी झालेला विनेशचा चेहरा बघण्यासारखा होता, तरी बघवत नव्हता. त्या चेहऱ्यावर मला खूप काही भासलं. साधारण 2 वर्ष सहन केलेल्या वेदना, आपल्याच व्यवस्थेकडून झालेला अपमान, अवहेलनेची चीड. या सगळ्या गोष्टींवर मात करत मेहनत करून गाठलेलं हे जेतेपदाचं समाधान. जगातील अव्वल क्रमांकावर असलेल्या खेळाडूला हारवल्याचा आनंद. झालेल्या अन्यायाला, भोगलेल्या अवहेलनेला आपल्या कर्तृत्वानी दिलेल्या सडेतोड उत्तराचा आवेश. ही खरी शक्ती. तिच्या चेहऱ्यावर "शक्ती" होती. ते काही क्षण तीच "शक्ती" होती".
पॅरिसमध्ये सुरू असलेल्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या ५० किलो वजनी गटामध्ये भारताच्या विनेश फोगाट हिने मंगळवारी दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत मुसंडी मारली होती. अंतिम सामन्यात विनेशची गाठ अमेरिकन महिला कुस्तीपटू एस. हिल्डब्रांट्स हिच्याविरुद्द होणार होता. मात्र तत्पूर्वीच ५० किलो वजनी गटामधून खेळणाऱ्या विनेशचं वजन काही ग्रॅमनं अधिक वाढल्यानं तिला अपात्र ठरवण्यात आलं. मात्र, आता या निर्णयाविरोधात अपील करण्याचा पर्याय भारताकडे आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, त्यांनी यासंदर्भात भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पी.टी. उषा यांच्याशी चर्चा केली आहे. याशिवाय, याप्रकरणी भारताकडे उपलब्ध असलेल्या पर्यायांची चाचपणी केली जात आहे.