बँकेचे हप्ते थकले, राहतं घर गेलं, पण..; आदिनाथसाठी वडील आहेत 'शक्तीमान', कारण सांगत म्हणाला..
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 12:04 PM2024-05-23T12:04:32+5:302024-05-23T12:05:50+5:30
Adinath kothare: कोठारे कुटुंबावर कोसळलेलं आर्थिक संकट; महेश कोठारेंच्या पडत्या काळाविषयी आदिनाथने केलं भाष्य
मराठी कलाविश्वातील हँडसम हंक अर्थात अभिनेता आदिनाथ कोठारे (adinath kothare) याची आज तरुणींमध्ये विशेष क्रेझ आहे. उत्तम अभिनय आणि पर्सनालिटी यांच्या जोरावर त्याने तुफान लोकप्रियता मिळवली आहे. लवकरच आदिनाथचा 'शक्तीमान' हा नवा कोरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे सध्या तो चर्चेत येत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने त्याने नुकतीच लोकमत फिल्मीला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने कोठारे कुटुंबावर कोसळलेल्या संकटाविषयी भाष्य केलं.
मराठी सिनेइंडस्ट्रीत महेश कोठारे यांनी त्यांचा चांगला जम बसवला आहे. उत्तम अभिनेता, निर्मात, दिग्दर्शक अशी त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. विशेष म्हणजे धुमधडाका, झपाटलेला, धडाकेबाज, थरथराट असे कितीतरी सुपरहिट सिनेमा देणारे महेश कोठारे एकेकाळी कर्जबाजारी झाले होते. परिणामी, त्यांच्या राहत्या घरावर बँकेने जप्ती आणली होती. याविषयी आदिनाथने मुलाखतीत भाष्य केलं.
"माझं टीवाय नुकतंच झालं होतं आणि मला पुढचं शिक्षण घ्यायचं होतं. त्यावेळी घरात खूप वाईट परिस्थिती होती. बाबांचे मागचे दोन सिनेमा चालले नव्हते. त्यामुळे खूप मोठं कर्ज त्यांच्यावर होतं. त्यावेळी कोल्हापूरला आम्ही खबरदार सिनेमा शूट करत होतो. त्यावेळी मी पहिल्यांदाच वडिलांना असिस्टंट म्हणून काम करत होतो. खूप टेन्शन होतं, घरात गोंधळाचं वातावरण होतं आणि या परिस्थितीत कामावर फोकस ठेऊन सिनेमा करणं कठीण होतं. आमचं शूट सुरु असतांना बँकेने आमचं मुंबईतलं घर सील करुन टाकलं. म्हणजे आमच्याकडे घरच नव्हतं..मुंबईत", असं आदिनाथ म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "ही गोष्ट मला आणि माझ्या आजी-आजोबांना सांगितलीच नव्हती. या सगळ्या परिस्थितीत खबरदारचं सगळं शुटिंग संपवलं. या काळात आई-बाबांनी आम्हाला कोणालाच काही कळू दिलं नाही. त्यानंतर मी आणि माझे आजी-आजोबा पुण्याला येऊन राहिलो.आणि, माझे आई-बाबा मुंबईत घर शोधत होते. त्यानंतर मग आम्ही कांदिवलीत शिफ्ट झालो. २००५ ची ही गोष्ट असेल. अशाही परिस्थिती माझ्या वडिलांनी माझ्या पुढच्या अभ्यासासाठी पुन्हा कर्ज घेतलं. ते कसं फेडणार, काय करणार काही माहित नाही. पण, शिक्षण थांबलं नाही पाहिजे. त्यामुळे माझ्या आयुष्यात तेच माझे शक्तीमान आहेत. म्हणजे आई-वडील दोघंही आहेत."
दरम्यान, महेश कोठारे यांनी त्याच्या 'डॅमइट आणि बरंच काही' या पुस्तकातही त्यांच्या कठीण काळावर भाष्य केलं आहे.