“...म्हणून कोणी मत देत नाही”, अमित ठाकरेंच्या टोलनाका प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याचं ट्वीट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 02:15 PM2023-07-24T14:15:23+5:302023-07-24T14:15:51+5:30
अमित ठाकरेंच्या समृद्धी महामार्गावरील टोलनाका प्रकरणानंतर मराठी अभिनेत्याने केलेलं ट्वीट चर्चेत
मनसे नेते आणि मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष अमित ठाकरे गेल्या काही दिवसांपासून उत्तर महाराष्ट्र दौरा करत आहेत. याचदरम्यान नाशिकला असताना सिन्नर येथील समृद्धी महामार्गावर अमित ठाकरेंचा ताफा टोलनाका कर्मचाऱ्यांनी अडवला होता. त्यानंतर संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी समृद्धी महामार्गावरील हा टोलनाका फोडला होता. याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणावरुन आता मराठी अभिनेता आरोह वेलणकरने ट्वीट केलं आहे.
आरोह सोशल मीडियावर सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. समाजातील अनेक घडामोडींवर तो ट्वीटच्या माध्यमातून व्यक्त होताना दिसतो. अमित ठाकरेंच्या टोलनाका प्रकरणानंतर आरोहने केलेलं ट्वीट चर्चेत आहे. आरोहने मनसे कार्यकर्त्यांचा समृद्धी महामार्गावरील टोलनाका फोडतानाचा व्हिडिओ ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. “हा काय फालतूपणा आहे. म्हणून कोणी मत देत नाही,” असं आरोहने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. त्याच्या या ट्वीटने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
"सुपरहिट का ‘राज’ है”, ‘बाईपण भारी देवा’ आणि राज ठाकरेंबरोबरचा फोटो शेअर करत सोनालीची पोस्ट
नेमकं काय घडलं?
मागील ३ दिवसांपासून अमित ठाकरे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. नंदूरबार, धुळे, जळगाव याठिकाणी त्यांनी मेळावे घेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर शनिवारी(२२ जुलै) मध्यरात्रीच्या सुमारास अमित ठाकरेंचा ताफा मुंबईच्या दिशेने जात होता. यावेळी सिन्नरजवळील समृद्धी महामार्गावरील टोलनाक्यावर अमित ठाकरेंची कार अडवण्यात आली. काही काळ अमित ठाकरेंना तिथे उभेदेखील राहावे लागले. फास्टटॅगच्या तांत्रिक बिघाडामुळे विलंब झाल्याची माहिती आहे. मात्र त्यानंतर अमित ठाकरे तिथून निघून गेले. पण मनसे नाशिक शहराध्यक्ष दिलीप दातार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी रागाच्या भावनेतून या टोलनाक्याची तोडफोड केली.