"राजसाहेबांचा फोन आला अन् मी.."; अशोकमामा असं काय म्हणाले की राज ठाकरेंना आवरलं नाही हसू
By देवेंद्र जाधव | Updated: February 28, 2025 13:34 IST2025-02-28T13:28:26+5:302025-02-28T13:34:59+5:30
अशोक सराफ यांनी मनसेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात जबरदस्त भाषण करुन सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणलं (ashok saraf)

"राजसाहेबांचा फोन आला अन् मी.."; अशोकमामा असं काय म्हणाले की राज ठाकरेंना आवरलं नाही हसू
'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'चे प्रमुख राज ठाकरे (raj thackeray) सातत्याने विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करत असतात. राज ठाकरेंनी काल मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शिवाजी पार्कला मान्यवरांना निमंत्रण देऊन कवितावाचनाचा एक आगळावेगळा कार्यक्रम केला. त्यावेळी पद्मश्री अशोक सराफ (ashok saraf) जेव्हा मंचावर आले तेव्हा त्यांनी केलेल्या भाषणाने सर्वांचीच मनं जिंकली. याशिवाय व्यासपीठावर एकच हशा पिकला. काय म्हणाले अशोक सराफ?
अशोक सराफ यांची भाषणातही फटकेबाजी
अशोक सराफ व्यासपीठावर येताच त्यांनी मनोगत द्यायला सुरुवात केली की, "मराठी भाषेबद्दल मी काही वेगळं बोलायला पाहिजे असं मला वाटत नाही कारण माझा जो सध्याचा बिझनेस आहे तो मराठी भाषेवरच अवलंबून आहे. मराठी भाषेतले वेगवेगळे स्तर दाखवण्यामध्येच माझा सगळा वेळ जात असते. मला राजसाहेबांचा फोन आला की, अभिजात भाषा दिन साजरा करतोय. त्यावेळेला तुम्हाला यायचंय. या कार्यक्रमात तुम्हाला कविता म्हणायची आहे. हे ऐकताच मी सुरुवातीला हादरलो."
"माझं सध्या शूटिंग चालू आहे आणि त्या शूटिंगमधून वेळ काढून येणं जरा कठीण वाटतंय. कारण बाकी सर्व थांबलंय आणि एपिसोडपण जायचाय तर मला वेळ मिळणार नाही, असं कारण मी त्यांना दिलं. राजसाहेब म्हणाले.. मी येऊन सांगू का त्यांना? विचारू का? मी म्हटलं नको.. तुम्ही बिलकुल येऊ नका. कारण माझ्या डोळ्यासमोर सगळं पुढचं चित्र उभं राहिलं. शेवटी मी कसं तरी त्यांना मनवलं. मला यायलाच पाहिजे होतं. राजसाहेबांनी मला बोलावलं आणि नाही म्हणणं मला शक्यच नाही."
"मी इथे आलो. खरं तर, कविता म्हणणं हा माझा धर्म नाही. आम्ही डायलॉग बोलतो. आता हे संवाद थोडे म्युझिकल होत असतील पण त्याला कविता नाही म्हणता येणार. मी म्हटलं काय होतंय बघूया आणि जाऊया." पुढे अशोकमामांनी सर्वांसमोर "विदुषकी हा माझा धंदा आहे अन् रुपया हा चोख बंदा आहे", ही आगळीवेगळी कविता म्हटली. अशोक सराफ यांच्या कवितेला सर्वांनी चांगलीच दाद दिली. राज ठाकरेंनाही अशोकमामांचं हे भाषण ऐकून हसू आवरलं नाही.