'छावा'ची ऑफर का नाकारली? अभिनेते अशोक शिंदेंनी केला महत्वाचा खुलासा; म्हणाले-
By देवेंद्र जाधव | Updated: March 19, 2025 12:58 IST2025-03-19T12:57:43+5:302025-03-19T12:58:07+5:30
मराठी अभिनेते अशोक शिंदेंना छावा सिनेमासाठी विचारणा झाली होती. त्यांनी या सिनेमाची ऑफर का नाकारली याविषयी महत्वाचा खुलासा केला आहे (ashok shinde, chhaava)

'छावा'ची ऑफर का नाकारली? अभिनेते अशोक शिंदेंनी केला महत्वाचा खुलासा; म्हणाले-
'छावा' सिनेमाची (chhaava) सध्या चांगलीच चर्चा आहे. १४ फेब्रुवारीला रिलीज झालेला 'छावा' सिनेमा अनेकांना आवडला. सिनेमा रिलीज होऊन महिन्याभराचा काळ उलटला तरीही आजही 'छावा' सिनेमा तिकीटबारीवर हाऊसफुल्ल प्रतिसादात सुरु आहे. 'छावा' सिनेमात अनेक मराठी कलाकार झळकले. संतोष जुवेकर, (santosh juvekar) सुव्रत जोशी, सारंग साठ्ये या मराठी कलाकारांनीही 'छावा'मधील भूमिका चांगल्याच गाजवल्या. अशातच मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते अशोक शिंदेंनी (ashok shinde) 'छावा'ची ऑफर का नाकारली? याचा खुलासा एका मुलाखतीत केलाय.
..म्हणून अशोक शिंदेंनी नाकारला छावा
'छावा'चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी 'छावा'मधील भूमिकेसाठी विचारलं असता अशोक यांनी नकार दिला. त्याविषयी लोकशाही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत अशोक म्हणाले की, "योगायोग असा झाला की, सिनेमातील जी भूमिका लक्ष्मण सरांनी मला विचारली होती, ती मला करावीशी वाटली नाही. मला वेगळी भूमिका अपेक्षित होती. त्यामुळे संगनमताने मी सांगितलं की, सर पुढच्या वेळेस आपण एकत्र काम करुया. जी भूमिका ऑफर झालेली ती महाराजांच्या विरोधातली आहे. महाराज म्हणजे माझं दैवत आहे. कारण जाणता राजामुळे माझ्या नसानसात छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज बसलेले आहेत. त्यामुळे मला भूमिका एवढी पटली नाही."
"असं कित्येकदा होतं की, मी निर्माता म्हणून एखाद्या दिग्दर्शकाला साईन करायला जातो. तेव्हा त्याला तो विषय आवडत नाही. त्यामुळे लक्ष्मण सरांसोबतही माझं तसंच बोलणं झालं. ते म्हणाले, ठीकेय! तुम्हाला आवडली नाही. पण पुढे आपण नक्की काम करुया. त्यामुळे आम्ही भविष्यात निश्चितच एकत्र काम करु कारण आमचे रिलेशन्स आजही तितकेच चांगले आहेत."