Atul Parchure: बालकलाकार... दिव्यांग मुलाची अजरामर भूमिका... बॉलिवूड... ते कॅन्सरवर मात! 'अतुल'नीय जिद्दीचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 08:33 PM2024-10-14T20:33:01+5:302024-10-14T20:34:52+5:30

बालकलाकार म्हणून सुरुवात, दिव्यांग मुलाची अजरामर भूमिका ते थेट कपिल शर्मा शो, अशी होती अतुल परचुरेेंची समृद्ध कारकीर्द (atul parchure)

marathi actor atul parchure passed away atul parchure biography movies natak | Atul Parchure: बालकलाकार... दिव्यांग मुलाची अजरामर भूमिका... बॉलिवूड... ते कॅन्सरवर मात! 'अतुल'नीय जिद्दीचा प्रवास

Atul Parchure: बालकलाकार... दिव्यांग मुलाची अजरामर भूमिका... बॉलिवूड... ते कॅन्सरवर मात! 'अतुल'नीय जिद्दीचा प्रवास

मराठी तसेच हिंदी मनोरंजनविश्वात नाव गाजवलेले हरहुन्नरी अभिनेते अतुल परचुरे यांचं ५७ व्या वर्षी निधन झालं. दीर्घ आजापणामुळे अतुल परचुरेंनी अखेरचा श्वास घेतला. नाटक, मालिका, सिनेमे अशा सर्वच माध्यमात अतुल परचुरेंनी विविधांगी भूमिका साकारल्या. बालकलाकार म्हणून अभिनयातील कारकीर्दीला सुरुवात केलेल्या परचुरेंनी पुढे  अनेक मालिका, सिनेमे ते थेट कपिल शर्माशोपर्यंत उत्कृष्ट भूमिका साकारुन चाहत्यांच्या मनात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं.

अतुल परचुरेंची समृद्ध कारकीर्द

अतुल परचुरेंनी रंगभूमीवर विविध नाटकांमधून काम करुन अभिनयाचा ढसा उमटवला. 'तरुण तुर्क म्हातारे अर्क' नाटकातला 'मुकुंदा' हा थोडासा स्त्रियांसारखा वागणारा मुलगा, 'नातीगोती' नाटकातला 'बच्चू' हा मतीमंद मुलगा या विभिन्न भूमिका साकारून अतुल यांनी उत्कृष्ट अभिनयाचं दर्शन घडवलं. पुढे अतुल परचुरेंनी पु. ल. देशपांडे यांच्यासमोर 'व्यक्ती आणि वल्ली' या नाटकात पु.लंची भूमिका साकारुन छाप पाडली. 'गेला माधव कुणीकडे', 'तुझे आहे तुजपाशी', 'वासूची सासू', 'डोळे मिटून उघड उघड', 'वाह गुरू', 'आम्ही आणि आमचे बाप' अशी अतुल परचुरेंची अनेक नाटकं खूप गाजली.


केवळ रंगभूमीच नाही तर चित्रपटक्षेत्रातही अतुल परचुरेंनी विविध भूमिका करून रसिकांच्या हृदयात हक्काचं आणि प्रेमाचं स्थान मिळवलं. 'नारबाची वाडी', 'हाय काय नाय काय', 'झकास', 'आम्ही सातपुते', 'नवरा माझा नवसाचा', 'पेइंग घोस्ट' अशा अनेक मराठी सिनेमात त्यांनी अभिनय केला.

तर 'चोरोंकी बारात', 'जिंदगी 50-50', 'लव्ह रेसिपी', 'छोडो कल की बाते', 'खट्टा मिठा', 'ऑल द बेस्ट', 'डिटेक्टिव्ह नानी', 'कलयुग', 'यकीन', 'फिर भी दिल है हिंदुस्तानी', 'बेदर्दी', 'जुडवा 2' अशा अनेक हिंदी चित्रपटांमधूनही त्यांनी आपल्या जबरदस्त अभिनयाने चाहत्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचं हसू उमटवलं आहे.

शाहरुखच्या "बिल्लू" चित्रपटातला चित्रीकरणाचा अफलातून प्रसंग अतुल परचुरे यांचा कमाल अभिनय रसिकांच्या अजूनही स्मरणात आहे. झी मराठीवरील "जागो मोहन प्यारे" आणि "भागो मोहन प्यारे" या मालिकांद्वारे अतुल परचुरे हे नाव खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचले. अतुल परचुरे अगदी काहीच दिवसांपूर्वी कपिल शर्मा शोमध्ये विनोदी भूमिका करुन प्रेक्षकांना हसवताना दिसले.


अतुल परचुरेंचं कुटुंब

अतुल परचुरेंच्या पत्नी सोनिया परचुरे या सुप्रसिद्ध नृत्यांगना आणि नृत्यदिग्दर्शिका आहेत. याशिवाय अतुल परचुरेंची मुलगी सखील ही एक फॅशन डिझायनर आहे.  कॅन्सरच्या तणावग्रस्त काळात सोनिया आणि संपूर्ण कुटुंब अतुल यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या.  गेल्या काही दिवसांपासून अतुल परचुरे मनोरंजन विश्नात फारसे सक्रिय नव्हते. कॅन्सरवर यशस्वी मात केल्यानंतरही त्यांच्यावर उपचार सुरु होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवल्याने मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार आणि चाहते हळहळ व्यक्त करत आहेत.

Web Title: marathi actor atul parchure passed away atul parchure biography movies natak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.