'छावा'मधील काही भूमिकांसाठी माझाही विचार झाला होता, मी नकार दिला; भूषण प्रधानचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 12:05 IST2025-03-18T12:04:59+5:302025-03-18T12:05:41+5:30

भूषण प्रधानने का दिला 'छावा'तील भूमिकेला नकार? कारण सांगत म्हणाला...

marathi actor bhushan pradhan reveals he was considered for roles in chhaava movie | 'छावा'मधील काही भूमिकांसाठी माझाही विचार झाला होता, मी नकार दिला; भूषण प्रधानचा खुलासा

'छावा'मधील काही भूमिकांसाठी माझाही विचार झाला होता, मी नकार दिला; भूषण प्रधानचा खुलासा

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' हा यावर्षीचा ब्लॉकबस्टर सिनेमा अजूनही थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. सिनेमाने ५०० कोटी पार कमाई केली आहे. विकी कौशलने साकारलेली छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका प्रेक्षकांच्या हृदयात कोरली गेली आहे. सिनेमात संतोष जुवेकर, शुभंकर एकबोटे, सारंग साठ्ये, सुव्रत जोशी या मराठी कलाकारांचीही भूमिका होती. आता नुकतंच अभिनेता भूषण प्रधानने (Bhushan Pradhan) 'छावा'सिनेमातील काही भूमिकांसाठी माझाही विचार झाला होता असा खुलासा केला.

अभिनेता भूषण प्रधानने २०२१ साली 'जय भवानी जय शिवाजी' मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली. या भूमिकेमुळे महाराज आजही त्याच्यात जिवंत आहेत असं तो म्हणतो. नुकतंच 'नवशक्ती'ला दिलेल्या मुलाखतीत भूषण म्हणाला, "महाराजांची भूमिका साकारायला मिळणं हे भाग्य मला लाभलं. मी ते जगलो. लोक प्रभावित होतील का वगरे माझ्या मनात नव्हतं. तर ही भूमिका मला मिळाली आहे तर मी ती मनापासून जगणार हेच मी ठरवलं होतं. 

तो पुढे म्हणाला, " ही भूमिका मिळणं हे नशीब तर आहेच. पण त्यासोबत प्लॅनिंगही असतं जे मी मॅनेजमेंटच्या पदवीवेळी शिकलो होतो तेच मी वापरतो. नशीब जरी असलं तरी ते आपल्यासाठी योग्य आहे का, आपण कशाला हो म्हणायचं कशाला नाही हे आपण ठरवतो. महाराजांच्या भूमिकेनंतर मला इतरही बऱ्याच ऐतिहासिक भूमिका लगेच मिळत गेल्या. अगदी आता आलेल्या 'छावा'मध्येही काही भूमिकांसाठी माझा विचार झाला होता. पण मला लक्षात आलं की आता मी एकदा महाराजांची भूमिका केल्यानंतर हिंदी चित्रपट आहे म्हणून त्यातली कोणती तरी भूमिका मी अशीच करणार नाही. त्यामुळे मी नाही म्हणूच शकतो. तो खूप मोठा चित्रपट होणार, त्यात आपण असू आणि सर्वांपर्यंत पोहोचू ही माझी आताची गरज नाही. मला माझ्या आताच्या प्रतिमेलाच धरुन राहायचं आहे. नुसतंच मिळतंय म्हणून नाही तर करिअरनुसार हे प्लॅनिंग करणं मी माझ्या मॅनेजमेंट डिग्रीमुळे आणि महाराजांच्या भूमिकेतून शिकलो. स्ट्रॅटेजी प्लॅनिंग काय असतं हे मला महाराजांचे संवाद वाचून आणि भूमिकेचा अभ्यास करत असताना आपोआप या गोष्टी येत गेल्या."

भूषण प्रधानचे 'जुनं फर्निचर' आणि 'घरत गणपती' हे मागील सलग दोन सिनेमे गाजले. आता त्याचा 'गाव बोलावतो' सिनेमा रिलीज होणार आहे. भूषण प्रधान सध्या मराठी इंडस्ट्रीत आघाडीवर आला आहे.

Web Title: marathi actor bhushan pradhan reveals he was considered for roles in chhaava movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.