Exclusive: 'ट्रोलर्स'विरोधात कायदा हवा, चिन्मय मांडलेकरचं स्पष्ट मत; पोलिसात तक्रार करणार?
By ऋचा वझे | Published: April 21, 2024 03:21 PM2024-04-21T15:21:30+5:302024-04-21T15:24:53+5:30
चिन्मय मांडलेकरने छत्रपती शिवरायांच्या भूमिकेतून रजा घेतलीये. यावर लोकमत फिल्मीशी त्याने सविस्तर संवाद साधला.
ऋचा वझे, मुंबई: अभिनेता, लेखक चिन्मय मांडलेकरला (Chinmay Mandlekar) आपण सिनेमांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत बघितलं आहे. दिग्पाल लांजेकर यांच्या 'शिवराय अष्टक'मधील आतापर्यंत आलेल्या पाच सिनेमांमध्ये चिन्मयची भूमिका होती. मात्र यापुढे तो ही भूमिका करणार नसल्याचं त्याने जाहीर केलं आहे. काही दिवसांपासून त्याच्या एका मुलाखतीनंतर तो लेकाचं नाव 'जहांगीर' असल्यामुळे खूप ट्रोल होतोय. पण आता त्यालाच नाही तर त्याच्या कुटुंबाविरोधातही अर्वाच्च शब्दात ट्रोलिंग सुरु आहे. कुटुंबाला मानसिक त्रास नको म्हणून चिन्मयने हा मोठा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्याने 'लोकमत फिल्मी'शी सविस्तर संवाद साधला.
ट्रोलिंगविरोधात कायदा हवा
'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या मुलाखतीत चिन्मय मांडलेकर म्हणाला, "मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. मनावर दगड ठेवून मी हा निर्णय घेतला आहे. काय सांगू अजून...मलाही वाईट वाटतंय पण प्रत्येक जण साहजिकच कुटुंबालाच अधिक प्राधान्य देणार. माझा मुलगा फक्त ११ वर्षांचा आहे त्याला याची समज नाही पण आम्ही हे कसं सहन करु शकतो? त्याचं नाव जहांगीर आहे हे मी काही पहिल्यांदा बोललो नाही. याआधीही मुलाखतींमधून बोललो आहे. मग या पातळीचं ट्रोलिंग आताच का होतंय? या ट्रोलर्सवर खरंतर कायदा आणायला पाहिजे. सोशल मीडिया सुरु झाल्यापासून ट्रोलर्स ही समाजाला लागलेली कीडच आहे. यांना आळा घालणारं कोणीच नाहीए पण याचा त्रास इतरांना सहन करावा लागतोय. माझ्या कुटुंबाच्या काळजीपोटीच मी छत्रपती शिवरायांची माफी मागून या भूमिकेतून रजा घेतोय.
पोलिसात तक्रार करणार का?
चिन्मय म्हणाला, "अजून माझ्या घरात कोणी घुसलेलं नाही. आणि तसंही या ट्रोलर्सला कोणतीच शिक्षा तर होत नाही. आजपर्यंत झालेली नाही. पण तरी सायबर पोलिसात मी तक्रार करेन कायदेशीर मार्गानेही जाईन.
रजा घेतो! चिन्मय मांडलेकरच्या कुटुंबाला होतोय मानसिक त्रास, लेकाच्या 'जहांगीर' नावामुळे ट्रोलिंग
दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरांशी बोलणं झालं...
तो पुढे म्हणाला, "दिग्पालसोबत माझं बोलणं झालं आहे. त्याला माझा निर्णय सांगितला आहे. मात्र काय बोलणं झालं ते आमच्यातच राहील. याविषयी मला वाच्यता करायची नाही.