'क्षमा धनी! बाप कोसळता माझा...', छत्रपती शिवरायांची मूर्ती कोसळल्यावर दिग्पाल लांजेकरांची डोळ्यात पाणी आणणारी कविता
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2024 01:04 PM2024-08-30T13:04:42+5:302024-08-30T13:08:52+5:30
शिवराज अष्टकची निर्मिती करणाऱ्या दिग्पाल लांजेकर यांनी छत्रपती शिवरायांवर भावुक कविता केलीय (digpal lanjekar)
मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला आणि सर्वांना धक्का बसला. महाराष्ट्रातील तमाम जनता या घटनेने हळहळली. या घटनेवर महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींनी निषेध व्यक्त केलाय. याशिवाय मनोरंजन विश्वातील कलाकारांनीही पोस्टच्या माध्यमातून संताप व्यक्त केलाय. अशातच शिवराजअष्टकची निर्मिती करणारे दिग्दर्शक-अभिनेते यांनी या घटनेविषयी एक भावुक कविता लिहिलीय.
दिग्पाल लांजेकरांची हृदयस्पर्शी कविता
दिग्पाल लांजेकर यांनी सोशल मीडियावर शिवाजी महाराजांचा एक व्हिडीओ पोस्ट करुन कविता लिहिलीय की, क्षमा धनी... गलबलला दर्या,
त्याचे अश्रू कुणा दिसेना
बाप कोसळता माझा,
वेदना उरी ती मावेना
चूक कुणाची कुणाची,
सारे भांडती भांडती
पण भाव स्वराज्याचा,
बघा सारेच सांडती.
रे माझ्या बापा शिवराया
तुमच्यासाठी उरे काया
नको मूर्ती ती लौकिक
नको स्मारक भौतिक
देवा शक्ती द्या लेकरा
तव कवतिक सांगाया
तव पराक्रमाचा तो
दीप लागू दे तेवाया
श्वास माझा हो संपू दे
तुमची स्मृती ती कोराया
मनामनाच्या अंतरी
तुमची मूर्ती साकाराया
दिग्पाल लांजेकरांनी शिवराज अष्टकची केली निर्मिती
ही कविता अनेकांच्या पसंतीस उतरली असून सर्वांनी भावुक कमेंट केल्या आहेत. "कॅपशन वाचताना डोळ्यात पाणी आलं", "राजं खरचं माफ करा.., मनाला भिडणारे लेखन आणि त्यातील भाव", अशी पोस्ट करुन अनेकांनी दिग्पाल लांजेकर यांनी पोस्ट केलेल्या कवितेला हृदयस्पर्शी म्हटलंय. दिग्पाल लांजेकर यांनी महाराजांच्या पराक्रमावर आधारीत 'पावनखिंड', 'फर्जंद', 'फत्तेशिकस्त', 'सुभेदार', 'शेर शिवराज' अशा सिनेमांची निर्मिती केलीय. दिग्पाल यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमांना प्रेक्षकांचं आणि शिवप्रेमींचं प्रेम मिळालंंय.