सिनेमात जुन्या गोष्टी दाखवता म्हणणाऱ्या विदेशी महिलेला नागराज मंजुळेंचं उत्तर; म्हणाले, 'जोपर्यंत तुम्ही..'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 12:05 PM2023-11-08T12:05:55+5:302023-11-08T12:07:47+5:30
Nagraj manjule: फँड्री सिनेमा पाहून विदेशी महिलेने केली खोचक कमेंट; नागराज मंजुळेंनी दिलं त्यांच्याच भाषेत उत्तर
उभ्या महाराष्ट्राला 'सैराट' करुन सोडणारा दिग्दर्शक, अभिनेता म्हणजे नागराज मंजुळे (Nagraj manjule). आजवरच्या कारकिर्दीत नागराज यांनी अनेक गाजलेल्या सिनेमांचं दिग्दर्शक केलं. विशेष म्हणजे मराठी कलाविश्वापासून सुरु झालेला त्यांचा हा प्रवास बॉलिवूडपर्यंत जाऊन पोहोचला आहे. 'सैराट', 'पिस्तुल्या', 'नाळ', 'झुंड' असे कितीतरी दर्जेदार सिनेमा त्यांनी कलाविश्वाला दिले. परंतु, खऱ्या आयुष्यात त्यांनी बराच स्ट्रगल केला आहे. त्यामुळेच त्यांच्या या स्ट्रगलचं प्रतिबिंब कुठे तरी त्यांच्या सिनेमात पाहायला मिळतं. परंतु, नागराज यांचा गाजलेला फॅण्ड्री हा सिनेमा पाहून एका फॉरेनर महिला प्रेक्षकाने खोचक कमेंट केली होती. तिच्या या कमेंटवर नागराज यांनीही सडेतोड उत्तर देत तिला वास्तवाची जाणीव करुन दिली.
एका दलित मध्यमवर्गीय कुटुंबात नागराज मंजुळे यांचा जन्म झाला आहे. त्यामुळे लहानपणापासून त्यांना अनेकदा हीनपणाची वागणूक मिळाली. या सगळ्या अनुभवामधूनच त्यांचे सिनेमा खऱ्या अर्थाने उदयाला आले. अनेक सिनेमांमध्ये त्यांनी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्षरित्या समाजातील ही परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांचा फँड्री हा सिनेमा पाहिल्यावर एका फॉरेनर महिलेने त्यांना 'तुम्ही जुने विषय सादर करता', असं म्हटलं होतं.
नागराज मंजुळे आहे दत्तकपुत्र; तुम्हाला माहितीये का त्यांचं खरं नाव?
नेमकं काय घडलं होतं?
नागराज मंजुळे यांचा 'फँड्री' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. या सिनेमाने आतापर्यंत अनेक पुरस्कार नावावर केले आहेत. या सिनेमाचं लंडनमध्ये स्क्रिनिंग पार पडलं होतं. त्यावेळी "तुम्ही खूप जुन्या काळातल्या गोष्टी दाखवता. आताच्या जमान्यातलं काहीच नसतं. ६०-७० च्या काळातली कथा तुम्ही आता दाखवता," असं ही महिला नागराज यांना म्हणाली. त्यावर, "जोपर्यंत तुम्ही अशा परिस्थितीतून जाणार नाही तोपर्यंत तुम्हाला त्याची समस्या जाणवणार नाही", असं ठोस उत्तर नागराज मंजुळे यांनी दिलं.
दरम्यान, नागराज मंजुळे लहान असताना एकदा त्यांच्या मोठ्या भावाला एका खड्यात पडलेलं डुक्कराचं पिल्लू काढायला सांगितलं होतं. त्यांचा भाऊ शाळेत हुशार होता. परंतु, ज्यावेळी खड्यात डुक्कराचं पिल्लू पडलं त्यावेळी शाळेतील १०० मुलांपैकी कोणालाच ते बाहेर काढायला सांगितलं नाही. मात्र, केवळ दलित असल्यामुळे नागराज यांच्या भावाला हे काम सांगितलं. या प्रकारानंतर नागराज मंजुळे प्रचंड चिडले होते. त्यांनी भावाला हे काम का केलं असा जाबही विचारला होता. विशेष म्हणजे या अनुभवामधून त्यांनी 'फ्रँडी' हा सिनेमा तयार केला होता.