'यशाच्या वाट्यात मराठी रंगभूमीची मदत'; डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितलं डबिंग क्षेत्रातील यशामागचं कारण
By शर्वरी जोशी | Published: March 27, 2022 07:35 PM2022-03-27T19:35:36+5:302022-03-27T19:37:07+5:30
Dr amol kolhe: राजकारण आणि कलाविश्व या दोन्ही क्षेत्रात यशस्वीपणे वाटचाल करत असतानाच आता त्यांनी डबिंग क्षेत्रातही पदार्पण केलं आहे.
राजकीय क्षेत्र आणि अभिनय क्षेत्रात यशस्वीरित्या वाटचाल करणारे डॉ. अमोल कोल्हे साऱ्यांनाच माहित आहेत. या दोन्ही क्षेत्रात त्यांनी त्यांचा ठसा उमटवला आहे. त्यामुळे आज जनमाणसांमध्ये ते लोकप्रिय आहेत. राजकारण आणि कलाविश्व या दोन्ही क्षेत्रात यशस्वीपणे वाटचाल करत असतानाच आता त्यांनी डबिंग क्षेत्रातही पदार्पण केलं आहे. 'बाहुबली' या चित्रपटाच्या मराठी डबसाठी त्यांनी त्यांचा आवाज दिला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी 'लोकमत ऑनलाइन'ला खास मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या कलाविश्वातील यशामागे मराठी रंगभूमी असल्याचं सांगितलं.
"ना मी कधी डबिंगचं प्रशिक्षण घेतलं, ना कधी अभिनयाचं पण या सगळ्या यशामागे मराठी रंगभूमी कारणीभूत ठरली, कारण, मी नाटकांमध्ये जरी कमी काम करत असलो तरीदेखील आतापर्यंत जितकी नाटकं केली त्या सगळ्याचे महाराष्ट्रातील प्रत्येक तालुक्यात त्याचे प्रयोग झाले. या या प्रयोगांमधूनच मी आवाजातील चढउतार, भाषेतील लहेजा शिकत गेलो. या प्रयोगांमधूनच मी आवाज कमवला", असं अमोल कोल्हे म्हणाले.
पुढे ते म्हणाले, "पण मी डबिंगसाठी किंवा आवाजासाठी कोणत्याही प्रकारचं प्रशिक्षण घेतलेलं नाही. ही प्रक्रिया म्हणजे रितसर शिकत जाणं आहे. वेगवेगळ्या शैलीचा अभ्यास करणं असेल किंवा मग डॉ. श्रीराम लागूंचं वाचिक अभिनय कोळून पिणं असेल. तर या सगळ्या गोष्टींचा फायदा मला डबिंगसाठी झाला असावा."
अमोल कोल्हे यांनी केलं प्रविण तरडेंच्या पत्नीचं कौतुक; कारण...
दरम्यान, ‘बाहुबली’ आणि ‘बाहुबली 2’ हे दोन्ही सिनेमे मराठीत डब केले गेले असून दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी मराठमोळ्या ‘बाहुबली’ची कलात्मक जबाबदारी सांभाळली. तसंच या चित्रपटासाठी डॉ. अमोल कोल्हे,गश्मीर महाजनी,मेघना एरंडे, सोनाली कुलकर्णी, उदय सबनीस, संस्कृती बालगुडे, या कलाकारांनी त्यांचा आवाज दिला आहे.