'वादळवाट' फेम अभिनेते डॉ विलास उजवणे यांचं निधन, वयाच्या ६१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 21:30 IST2025-04-04T21:29:06+5:302025-04-04T21:30:14+5:30

Dr Vilas Ujawane: ब्रेन स्ट्रोक आजाराशी दिली झुंज, त्यावर मातही केली मात्र नंतर...

marathi actor dr vilas ujawane passes away at the age of 61 worked in marathi hindi serials and movies | 'वादळवाट' फेम अभिनेते डॉ विलास उजवणे यांचं निधन, वयाच्या ६१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

'वादळवाट' फेम अभिनेते डॉ विलास उजवणे यांचं निधन, वयाच्या ६१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मराठी मालिका, सिनेमा आणि हिंदी मनोरंजनविश्वातही झळकलेले हरहुन्नरी अभिनेते डॉ विलास उजवणे (Dr Vilas Ujawane) यांचं निधन झालं आहे. वयाच्या ६१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काही वर्षांपूर्वी त्यांना ब्रेन स्ट्रोक हा गंभीर आजार झाला होता. त्यावर त्यांनी मात केली होती. मात्र नंतर हृदयासंबंधी विकार झाल्याने पुन्हा त्यांची तब्येत खालावली होती. आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगा आहे.

अभिनेते विलास उजवणे यांना २०२२ साली ब्रेन स्ट्रोक आजाराने ग्रासले होते. त्यांना ठाण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारासाठी लागणारा खर्च वाढतच गेला आणि त्यांची जमापुंजीही संपली. त्यांचा मित्र राजू कुलकर्णी यांनी फेसबुक पोस्ट करत इंडस्ट्रीतील सर्व कलाकारांना, संस्थांना आणि चाहत्यांना आर्थिक मदतीचं आवाहन केलं होतं. यानंतर ते आजारातून बरेही झाले. त्यांनी पुन्हा कमबॅकही केलं होतं. 'कुलस्वामिनी' मराठी सिनेमात त्यांनी काम केलं. '२६ नोव्हेंबर'  या मराठी सिनेमातही त्यांनी भूमिका साकारली आहे जो पुढील महिन्यात रिलीज होणार आहे. त्याआधीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे.

डॉ विलास उजवणे यांच्याबद्दल

विलास उजवणे यांचा जन्म नागपूरमध्ये झाला. नागपूर विद्यापिठातून त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेतलं. पदवी मिळवली. मात्र त्यांना अभिनयाची आवड होती. नंतर मुंबईत येऊन त्यांनी मनोरंजन क्षेत्रात आपलं स्थान निर्माण केलं. अनेक व्यावसायिक नाटकांमध्ये त्यांनी काम केलं. ‘शुभम भवतू’ या डायलॅागमुळे डॉ विलास उजवणे घरोघरी लोकप्रिय झाले होते. 'चाल दिवस सासूचे', 'वादळवाट', 'दामिनी' यासह अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये त्यांनी सहजसुंदर अभिनय केला. हिंदी सिनेमांमध्येही त्यांनी काही भूमिका साकारल्या. ११० सिनेमे, १४० मालिकांमध्ये त्यांनी काम केलं. असा त्यांचा कलाविश्वातला प्रवास राहिला आहे.

Web Title: marathi actor dr vilas ujawane passes away at the age of 61 worked in marathi hindi serials and movies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.