'आम्ही हिंदू' असं म्हटल्यावर लोकांना आक्षेपार्ह का वाटतं? , गश्मीर महाजनीची पोस्ट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2024 04:59 PM2024-01-25T16:59:24+5:302024-01-25T17:00:15+5:30
"हिंदू असल्याचा अभिमान आहे," गश्मीर महाजनीच्या पोस्टने वेधलं लक्ष
मराठी सिनेसृष्टीतील हँडसम हंक अशी ओळख मिळवलेला अभिनेता म्हणजे गश्मीर महाजनी. वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत गश्मीर अभिनय क्षेत्रात आला. नाटक आणि सिनेमांमध्ये काम करून त्याने कलाविश्वात मेहनतीच्या जोरावर जम बसवला. गश्मीरने मराठीबरोबरच हिंदी सिनेसृष्टीतही त्याची स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली. गश्मीरचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. तो सोशल मीडियावरही सक्रिय असतो.
गश्मीर आगामी प्रोजेक्टबाबत चाहत्यांना पोस्टद्वारे माहिती देत असतो. तो अनेकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्याबाबतही पोस्ट शेअर करताना दिसतो. सध्या गश्मीरच्या अशाच एका पोस्टची चर्चा रंगली आहे. गश्मीरने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये गश्मीर म्हणतो, "आपण धार्मिक आहोत आणि सगळ्या धर्मांचा आदर करतो. पण, 'आम्ही हिंदू' असं म्हटल्यावर लोकांना आक्षेपार्ह का वाटतं?" गश्मीरच्या या पोस्टने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या स्टोरीला त्याने "रघुपती राघव राजाराम" हे गाणंही टाकलं आहे. याबरोबरच त्याने आणखी एक पोस्ट शेअर करत "हिंदू असल्याचा अभिमान आहे," असंही म्हटलं आहे.
गश्मीरने 'कॅरी ऑन मराठा', 'देऊळ बंद', 'सरसेनापती हंबीरराव', 'बोनस', 'नव वे तिकीट', 'धर्मवीर' अशा अनेक मराठी सिनेमांत काम केलं आहे. त्याने मराठीबरोबरच हिंदीतही अभिनयाचा ठसा उमटवला. इमली, तेरे इश्क मे घायल या हिंदी मालिकांमध्ये गश्मीर झळकला. तर 'पानीपत', 'मुस्कुराके देख जरा', 'डोंगरी का राजा' या हिंदी सिनेमांत तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसला.