गौरव मोरेच्या 'अल्याड पल्याड'ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड! ७ दिवसांतच कोट्यवधींची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2024 16:12 IST2024-06-21T16:02:36+5:302024-06-21T16:12:45+5:30
'अल्याड पल्याड' सिनेमाची बॉक्स ऑफिसवर हवा, पहिल्या आठवड्याचं कलेक्शन समोर

गौरव मोरेच्या 'अल्याड पल्याड'ची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड! ७ दिवसांतच कोट्यवधींची कमाई
सध्या 'अल्याड पल्याड' या मराठी सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. अभिनेता गौरव मोरे मुख्य भूमिकेत असलेला हा सिनेमा १४ जूनला सर्वत्र प्रदर्शित झाला. या हॉरर सिनेमाची ट्रेलरपासूनच प्रेक्षकांना उत्सुकता होती. 'अल्याड पल्याड' सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचं चित्र आहे. हा सिनेमासाठी पाहण्यासाठी प्रेक्षक सिनेमागृहात गर्दी करताना दिसत आहेत. बॉक्स ऑफिसवरही हा सिनेमा चांगली कमाई करताना दिसत आहे. या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे.
पहिल्या दिवसापासूनच 'अल्याड पल्याड' सिनेमाची बॉक्स ऑफिसवर हवा पाहायला मिळत आहे. बॉलिवूड सिनेमांना गौरव मोरेचा 'अल्याड पल्याड' टक्कर देत आहे. या सिनेमाने तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर १.०७५ कोटींची कमाई केली होती. वीकेंडनंतरही या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं दिसत आहे. 'अल्याड पल्याड' या हॉरर मराठी सिनेमाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घोडदौड सुरू आहे. आता सिनेमाच्या पहिल्या आठवड्याच्या कलेक्शनचे आकडे समोर आले आहेत. या सिनेमाने सात दिवसांत तब्बल २.१९ कोटींचा गल्ला जमवला आहे.
रहस्य, थरार आणि सोबत मनोरंजन असं पॅकेज असलेला 'अल्याड पल्याड' प्रेक्षकांना भावला आहे. या चित्रपटाची निर्मिती शैलेश जैन आणि महेश निंबाळकर यांनी केली असून दिग्दर्शन प्रीतम एस के पाटील यांचे आहे. मकरंद देशपांडे, गौरव मोरे, संदीप पाठक, सक्षम कुलकर्णी, सुरेश विश्वकर्मा, चिन्मय उदगीरकर, भाग्यम जैन, अनुष्का पिंपुटकर आदि कलाकारांच्या भूमिका ‘अल्याड पल्याड' चित्रपटात आहेत.