जयंत सावरकरांच्या निधनाला वडापाव ठरला कारणीभूत? मंगेश देसाईची मोठी माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 05:18 PM2023-07-25T17:18:40+5:302023-07-25T17:20:07+5:30
Jayant sawarkar: प्रसिद्ध अभिनेता, निर्माता मंगेश देसाई यांनी जयंत सावरकरांच्या निधनाविषयी मोठं वक्तव्य केलं आहे.
मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर (jayant sawarkar) यांचं नुकतंच निधन झालं. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मराठी कलाविश्वातील अण्णा म्हणून लोकप्रियता मिळवलेल्या या अभिनेत्याचं निधन झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. अनेक कलाकार जयंत सावरकरांना आदरांजली अर्पण करण्यासोबतच त्यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. यामध्येच प्रसिद्ध अभिनेता, निर्माता मंगेश देसाई (Mangesh desai) यांनी जयंत सावरकरांच्या निधनाविषयी मोठं वक्तव्य केलं आहे.
मंगेश देसाई यांनी Zee 24 Taas ला दिलेल्या बाईटनुसार, एक धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. त्यादिवशी जयंत सावरकर यांनी वडापाव खाल्ला होता. ज्यामुळे त्यांना अॅसिडिटीचा त्रास झाला.
'एखाद्या कलाकाराला राग आला असता'; 'सिंघम'च्या सेटवर जयंत सावरकरांना मिळाली होती अशी वागणूक
"वयाच्या ८८ व्या वर्षीही जयंत सावरकर म्हणजेच आण्णा अॅक्टिव्ह होते. अण्णा कायम पथ्यपाणी पाळायचे. आहाराकडे अजिबात दुर्लक्ष न करणारे, दररोज मॉर्निंग वॉकला जाणारे. पण, एक वडापाव निमित्त ठरलं आणि त्याने त्यांना अॅसिडीटी झाली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात अॅडमीट करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला", असं मंगेश देसाई म्हणाले.
पुढे ते म्हणतात, "आपल्या एक्झिटची वेळ झालीये हे बहुधा त्यांना कळलं असावं. अण्णा गेले हे पटतच नाहीये. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आण्णा म्हणजे आमच्या वयालादेखील लाजवणारे होते. फिटनेसवर लक्ष दे असं कायम म्हणणारे सुद्धा आण्णाच होते. त्यांच्या जाण्याने खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे."
दरम्यान, जयंत सावरकरांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टी हळहळली आहे. ‘एकच प्याला’तील तळीराम, ‘तुझे आहे तुजपाशी’ मधील आचार्य, ‘व्यक्ती आणि वल्ली’तील अंतू बर्वा आणि हरितात्या या भूमिका त्यांनी संस्मरणीय केल्या. सौजन्याची ऐशीतैशी, सूर्यास्त, टिळक आगरकर, ययाति आणि देवयानी, याही नाटकांमधून सावरकरांनी छाप पाडली.