'अशोक सराफशी दोस्ती कर पण निळू फुलेच्या नादाला लागू नकोस';किरण मानेला मिळाला होता सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2023 08:54 AM2023-06-22T08:54:17+5:302023-06-22T08:59:30+5:30
निळू फुले यांच्या खलनायकी भूमिका गाजल्या. त्यामुळे निळू फुले खऱ्या आयुष्यातही असेच आहेत असा अनेकांचा समज होता.
मराठी कलाविश्वातील दोन दिग्गज कलाकार म्हणजे अशोक सराफ(ashok saraf) आणि निळू फुले (nilu phule). या दोन्ही कलाकारांनी मराठी चित्रपटसृष्टी गाजवली. त्यामुळे आजही त्यांचे अनेक सिनेमा गाजताना दिसतात. या कलाकारांनी कधी नायक तर कधी खलनायक होऊन प्रेक्षकांची मनं जिंकली. यात खासकरुन निळू फुले यांच्या खलनायकी भूमिका गाजल्या. त्यामुळे निळू फुले खऱ्या आयुष्यातही असेच आहेत असा अनेकांचा समज होता. इतकंच नाही तर मराठी कलाविश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्याला निळू फुले यांच्यापासून लांब राहण्याचा सल्लाही देण्यात आला होता.
मराठी कलाविश्वात सातत्याने चर्चेत राहणारा अभिनेता म्हणजे किरण माने (kiran mane). कलाविश्वात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर भाष्य करणारे किरण माने बऱ्याचदा त्यांच्या जीवनातील काही किस्सेदेखील नेटकऱ्यांसोबत शेअर करत असतात. यावेळी त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या आजीने त्यांना दिलेल्या सल्ल्याविषयी भाष्य केलं आहे.
काय आहे किरण मानेंची पोस्ट?
"किरन, त्या अशोक सराफशी दोस्ती कर पन निळू फुल्याच्या नादाला लागू नगं..लै बेकार हाय त्यो...तस्ली संगत लै वंगाळ." ...सातार्यातल्या माझ्या घरी निळू फुले येऊन गेले हे कळाल्यावर आजी घाबरून म्हन्लीवती. तिला वाटलं आपला नातू बिघडला ! तिला सिनेमातलं सगळं खरं वाटायचं. कितीही समजाऊन सांगीतलं तरी पटायचं नाही तिला...
आजीला आम्ही 'काकी' म्हणायचो. आईची आई. लै लै लै माया केली तिनं माझ्यावर. सगळ्याच नातवंडांवर तिचा जीव होता. ल्हानपणी सुट्टीत आजोळला, बारामतीजवळ कोर्हाळ्याला जाताना मला एकच ओढ असायची ती म्हणजे तिच्या हातचा शिरा ! "माज्या किरन्याला गरा आवाडतो बया" म्हणत खास माझ्यासाठी वेगळा शिरा करायची. लै लाड करायची. भल्या पहाटे अंगणात बंब तापवून घंघाळ्यात गरम पाणी काढून आम्हाला अंघोळ घालण्यापासून रात्रीच्या जेवणापर्यन्त तिला अखंड राबताना पहायचो... रात्री मात्र गुडूप झोपेपर्यन्त आमच्याशी गप्पा मारत बसायची. जुन्या आठवणी सांगायची.
आमची उन्हाळ्याची सुट्टी संपल्यावर परत निघताना मामा बैलगाडी तयार करायचे. गोनपाटात भात्यान भरून त्याची गादी टाकून, बैलं जुंपायचे. थोपटे वस्तीपास्नं स्टँडवर जायला बैलगाडी निघाली की काकींच्या डोळ्यातून आसवांच्या धारा सुरू व्हायच्या. आमच्याकडे बघत डोळे पुसत ती गाडीमागं लांब-लांबपर्यन्त चालत यायची. आम्ही 'टाटा' करत हात हलवायचो. गाडी दिसेनाशी होईपर्यन्त आमच्याकडे बघत बसायची.. सगळ्या सुना आणि नातसुनांशी काकींची घनिष्ट मैत्री होती ! एवढेच नव्हे तर शेजारपाजारच्या सुना आणि सासवांबरोबरही तिचे गुळपीठ होते. सगळीकडे काकी 'लोकप्रिय'. बालपण आणि तरुणपण लै लै लै कष्टात आणि हलाखीत गेलं पण त्याची जर्राही खंत तिने कधी बोलून दाखवली नाही. बख्खळ आयुष्य लाभलं तिला. नातवंडांची मुलंबी तिच्या मांडीवर खेळली !
जवळजवळ नऊ वर्ष झाली. मी मुंबईत होतो. नाटकाचे सलग प्रयोग लागले होते. प्रयोगाला जातानाच फोन आला 'काकी गेल्या'... मेंदू बधिर झाला. अस्वस्थ झालो. काकींचं अंत्यदर्शनही घेता येणार नाही या जाणीवेनं ढसाढसा रडलो. एकटाच. त्यानंतर साताठ दिवसांनी गेलो.सतत उत्साहानं सळसळणारं माझं आजोळ पहिल्यांदा एवढं उदास आणि भकास पाहिलं मी. सगळं होतं पण माझी काकी नव्हती ! खरंतर माणूस गेल्यावर महिनाभर तरी घरात गोडधोड करत नाहीत पण मामींनी माझ्यासाठी शिरा केला.म्हणाल्या "लाडका नातू आलाय. 'गरा' केला नाही तर काकींना बरं वाटंल का?" ...डोळे भरुन आले. गळा दाटून आला. घास घशाखाली उतरेना.