'थोडी थंडी वाजते पण...', यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर काय वाटतं? लक्ष्याने दिलेलं उत्तर ऐकलंत?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2024 06:21 PM2024-08-13T18:21:21+5:302024-08-13T18:22:46+5:30
लक्ष्मीकांत बेर्डे यांनी दूरदर्शनवर दिलेली मुलाखत सध्या चांगलीच व्हायरल झालीय. यात त्यांनी अनेक प्रश्नांची मनमोकळी उत्तरं दिली आहेत (laxmikant Berde)
लक्ष्मीकांत बेर्डेचं नाव ऐकलं की आपल्या चेहऱ्यावर आपसूक हसू येतं. लक्ष्मीकांत बेर्डे आज जरी आपल्यात नसले तरी त्यांचे सिनेमे आजही आपल्याला खळखळून हसवतात. लक्ष्मीकांत यांचे 'अशी ही बनवाबनवी', 'दे दणादण', 'धूमधडाका', 'एक होता विदूषक' असे अनेक सिनेमे आजही तितकेच आवडीने पाहिले जातात. लक्ष्मीकांत यांचे पाय किती जमिनीवर होते, याचा अनुभव त्यांच्या मुलाखती पाहून होतो.
लक्ष्मीकांत बेर्डेंची जुनी मुलाखत चर्चेत
लक्ष्मीकांत बेर्डे यांनी दूरदर्शनला एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला होता. यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर काय वाटतं असा प्रश्न लक्ष्मीकांत बेर्डेंना विचारण्यात आला होता. त्यावेळी लक्ष्मीकांत यांनी उत्तर दिलं की, "यशाच्या शिखरावर असताना थोडी थंडी वाजते.. पण प्रेक्षकांच्या मायेची ऊब एवढी आहे की थंडी काहीच वाटत नाही..." लक्ष्मीकांत लोकप्रियतेच्या शिखरावर असला तरीही त्यांचे पाय किती जमिनीवर होते याचा अनुभव ही मुलाखत पाहून येतो.
आधी लॉटरीची तिकिटं विकली अन् पुढे...
लक्ष्मीकांत याच मुलाखतीत म्हणाले होते, "मी आधी उदबत्ती, उटणं अशा गोष्टी विकल्या आहेत. कारण त्यातून मिळणाऱ्या पैशातून मी स्वतःसाठी चांगले कपडे विकत घ्यायचो. याशिवाय मी आधी लॉटरीची तिकिटं सुद्धा विकली आहेत. पुढे याच लॉटरीच्या तिकिटांवर माझा फोटो होता." अशाप्रकारे लक्ष्मीकांत बेर्डेंनी मुलाखतीत खुलासा केला होता. लक्ष्मीकांत बेर्डेंची पुढची पिढी म्हणजेच अभिनय बेर्डे आणि स्वानंदी बेर्डे दोघेही मनोरंजन विश्वात कार्यरत आहेत.