"वर्ल्डकपमुळे मी बारावीत नापास झालो होतो", प्रवीण तरडेंचा खुलासा, म्हणाले, "मॅच होती म्हणून परीक्षेला..."
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 03:19 PM2023-10-05T15:19:25+5:302023-10-05T15:21:42+5:30
प्रत्येक वर्ल्ड कपला नवीन टीव्ही घेतात प्रविण तरडे, म्हणाले, "यंदाही भारत-पाक सामन्यावेळी..."
सगळ्यांचं लक्ष लागलेल्या बहुचर्चित वन डे विश्वचषकाला आजपासून सुरुवात होत आहे. माजी खेळाडूंबरोबरच चाहत्यांकडून भारताला वर्ल्डकपसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत. यंदाच्या विश्वचषकाची ट्रॉफी टीम इंडियाने जिंकावी अशी भारतीय आणि क्रिकेटप्रेमींची इच्छा आहे. वर्ल्डकपचे सामने पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमी हातातलं सगळं काम बाजूला ठेवून टीव्हीसमोर बसतात. प्रवीण तरडेदेखील वर्ल्ड कपची मॅच पाहण्यासाठी बारावीचा पेपर अर्धवट सोडून आले होते.
प्रवीण तरडे हे मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. तरडेंनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत १९९२ सालच्या वर्ल्ड कपची एक आठवण सांगितली आहे. "मी सचिनचा खूप मोठा चाहता आहे. मी सचिनची बॅटिंग पाहिली नाही तर तो लवकर आऊट होऊन आपण सामना हरू, असं मला वाटायचं. तेव्हा बारावी बोर्डाची परीक्षा होती आणि आपला सामनाही होता. मला तो सामना पाहायचा होता. लवकर पेपर देऊन घरी येऊन सामना बघायचं मी ठरवलं होतं," असं मटाला दिलेल्या मुलाखतीत प्रवीण तरडेंनी सांगितलं.
वर्ल्ड कपमुळे प्रवीण तरडे बारावीत नापास झाले होते. पुढे ते म्हणाले, "परीक्षाकेंद्रात किमान अर्धा तास बसण्याचा नियम होता. त्यामुळे मी केवळ अर्धा तास बसून लगेच निघालो. त्या परीक्षेत मी नापास झालो होतो. त्याच वर्षी डिसेंबरमध्ये पुन्हा परीक्षेला बसलो आणि चांगल्या गुणांनी पास झालो. बारावीत नापास झाल्यामुळे वडिलांनी मला शिक्षाही केली होती. क्रिकेटची मॅच पाहण्यासाठी मी माझ्या मनासारखा वागलो होतो. तेव्हा मला वडिलांनी पास होईपर्यंत स्वत: पैसे कमवून घरी जेवणाचे पैसे देण्यास सांगितलं होतं."
"अलीकडच्या काही वर्षांमध्ये मी दर वर्ल्डकपला घरी नवा टीव्ही खरेदी करतो. आताही भारत-पाकिस्तान सामन्याच्या वेळी मॅच छान पाहता यावी म्हणून मी नवीन टीव्ही घेणार आहे," असंही प्रवीण तरडे म्हणाले.