सिनेमापेक्षा निवडणुका जास्त मनोरंजक! मराठी अभिनेत्याचा खोचक टोला, म्हणाला- "मी अभिनयही राजकारण्यांकडून..."
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2024 05:49 PM2024-10-27T17:49:50+5:302024-10-27T17:50:07+5:30
पुष्कर AI : द धर्मा स्टोरी या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने तो अनेक ठिकाणी मुलाखती देत आहे. अशाच एका मुलाखतीत त्याने राजकारणावर भाष्य केलं आहे.
पुष्कर जोग हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. जबरदस्त या सिनेमातून त्याने कलाविश्वात पदार्पण केलं होतं. पहिल्याच सिनेमाने पुष्करला लोकप्रियता मिळवून दिली. आता पुष्कर AI : द धर्मा स्टोरी या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाच्या निमित्ताने तो अनेक ठिकाणी मुलाखती देत आहे. अशाच एका मुलाखतीत त्याने राजकारणावर भाष्य केलं आहे.
पुष्कर अनेकदा समाजातील घटनांवर अगदी परखडपणे भाष्य करताना दिसतो. एबीपी माझाला सिनेमाच्या निमित्ताने दिलेल्या मुलाखतीत त्याने सध्याच्या राजकारणावर त्याचं मत मांडलं आहे. पुष्कर म्हणाला, "विधानसभा निवडणुका या माझ्या सिनेमापेक्षा जास्त मनोरंजक आहेत. खरं सांगायचं तर आपण सगळेच जण खड्ड्यात आहोत. आपण कुणाला वोट केलंय...कोणत्या पक्षाच्या व्यक्तीला वोट केलंय...तेच माहीत नाही". "बिग बॉसपेक्षा राजकारण जास्त इंटरेस्टिंग वाटतं का?" असं विचारल्यावर पुष्कर म्हणाला, "हो नक्कीच".
"मी लोकसभा आणि विधानसभा फॉलो करतोय. खरं सांगायचं तर मी अभिनय राजकीय नेत्यांकडून शिकतो. ज्या पद्धतीने राजकारणी खोटं बोलतो, ते जबरदस्त आहे. मी या राज्याचा नागरिक आहे. मी खूप टॅक्सही भरतो. त्यामुळे मी बोलणार. कारण माझा तो हक्क आहे. आता छान निवडणुका येत्यात तर सगळ्यांनी एन्जॉय करा", असंही पुढे त्याने सांगितलं.
‘दि एआय धर्मा स्टोरी’ (The AI Dharma Story) या सिनेमाचं दिग्दर्शनही पुष्करनेच केलं आहे. हा एक थरारक चित्रपट असून आजच्या काळातील विदारक सत्य यात दाखवण्यात आले आहे. एक वडील आपल्या मुलीच्या जीवासाठी कसे लढा देतात, हे या सिनेमातून दाखवण्यात आलं आहे. पुष्करने या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली असून स्मिता गोंदकर, दीप्ती लेले याही या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. २५ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.