Riteish Deshmukh : बायकोला ‘तुम्ही’, ‘आम्ही’ मग आईला एकेरी का? रितेश देखमुखचं उत्तर ऐकून तुम्हीही कराल कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 06:16 PM2023-01-03T18:16:41+5:302023-01-03T18:27:46+5:30
Riteish Deshmukh : रितेश समोरच्या प्रत्येक व्यक्तीला ‘तुम्ही’, ‘तुम्हाला’ असं आदरार्थी बोलतो. अगदी बायको जिनिलियादेखील तुम्ही, आम्ही करतो. फक्त आईला तो ‘ए आई’ म्हणतो. असं का?
रितेश देशमुख (Riteish Deshmukh) आणि जिनिलिया देशमुख ( Genelia Deshmukh) हे चाहत्यांचं आवडतं कपल. सध्या भाऊ-वहिनींची चांगलीच चर्चा आहे. नुकताच दोघांचा ‘वेड’ (Ved) हा सिनेमा प्रदर्शित झालाय आणि या सिनेमानं प्रेक्षकांना वेड लावलं आहे. रितेश व जिनिलिया केवळ त्यांच्या कामामुळेच नाही तर पर्सनल लाईफमुळेही चर्चेत असतात. दोघांचं एकमेकांना आदर देत बोलणं, मुलांवर केलेले उत्तम संस्कार, कुटुंबाबद्दलचं अपार प्रेम या सगळ्या कारणांसाठी या जोडप्याची चर्चा होते. रितेश समोरच्या प्रत्येक व्यक्तीला ‘तुम्ही’, ‘तुम्हाला’ असं आदरार्थी बोलतो. अगदी बायको जिनिलियादेखील तुम्ही, आम्ही करतो. इतकंच नाही मुलांसोबत बोलतानाही तो कधीच त्यांचा एकेरी उल्लेख करत नाही. अपवाद फक्त आईचा. फक्त आईला तो ‘ए आई’ म्हणतो. असं का? एका ताज्या मुलाखतीत रितेशने यामागचं कारण सांगितलं आणि त्याच्या उत्तराने सगळेच भारावले.
‘सकाळ’ला दिलेल्या मुलाखतीत त्याला याबद्दल छेडलं असता तो म्हणाला, आमच्या घरी मी फक्त माझ्या आईलाच एकेरी हाक मारतो. मी माझ्या मुलांना देखील ‘तुम्ही’ म्हणतो. ही आमच्या घरातील परंपरा आहे. माझे आजोबा मला ‘तुम्ही’ म्हणायचे, माझे काका मला ‘तुम्ही’ म्हणतात, माझ्या लहान बहिणीच्या मुलांनाही मी ‘तुम्ही’च म्हणतो. प्रत्येकाला आहो जाहो म्हणण्याची परंपरा रूजलेली आहे. प्रत्येक घरातली बोलण्याची पद्धत वेगवेगळी असते. काहीजण प्रत्येकाला एकेरी हाक मारून प्रेम व्यक्त करतात.
मग आईला का एकेरी हाक मारतोस?
यावेळी रितेशने एक किस्साही सांगितला. तो म्हणाला, ‘एकदा मला एका अमराठी व्यक्तीने याबद्दलच प्रश्न केला होता. तुम्ही प्रत्येकाचा आदरार्थी उल्लेख करता पण तुमच्या आईला मात्र तुम्ही ‘ए आई’ हाक मारता, असं का? असं त्याने मला विचारलं होतं. त्यावर मी म्हणालो होतो, ‘तुम्ही बोलताना नेहमी शंकरजी, शिवजी, रामजी, गणेशजी असं म्हणता. पण आम्ही राम, शंकर, गणपती असं म्हणतो. देवाची आणि आईची जागा ही एकच आहे. त्यामुळे देवालाही ‘तू’आणि आईलाही ‘तू’ असं माझं मत आहे. रितेश हे बोलला आणि साहजिकच त्याच्या उत्तराने सगळ्यांची मनं जिंकली...