गोष्ट चोरल्याचा आरोप, कॉपीराइटमध्ये अडकली सीरिज, समीर खांडेकरला का चढावी लागली कोर्टाची पायरी?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2023 02:25 PM2023-10-01T14:25:26+5:302023-10-01T14:41:16+5:30
'देवाक काळजी' ही वेबसीरिज प्रदर्शित झाली. पण, ही सीरिज प्रदर्शित होण्यापुर्वीच वादात अडकली होती.
'कोर्टाची पायरी शहाण्या माणसाने चढू नये' असं म्हणतात. पण कोर्टाची पायरी चढल्यामुळेच एक मराठी अभिनेता आपल्यावरील बिनबुडाचे आरोप पुसून टाकू शकला. हा दुसरा तिसरा कोणी नाही तर 'काहे दिया परदेस', 'ती परत आलीये' सारख्या मालिकेतून लोकांसमोर आलेला अभिनेता समीर खांडेकर. समीर खांडेकरने अनेक मराठी मालिका, चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्याची छोट्या पडद्यावरची वैजू नं वन ही मालिकाही प्रचंड गाजली होती. नुकतेच त्याची 'देवाक काळजी' ही वेबसीरिज प्रदर्शित झाली. पण, ही सीरिज प्रदर्शित होण्यापुर्वीच वादात अडकली होती.
View this post on Instagram
१५ सप्टेंबरला 'देवाक काळजी' ही सीरिज प्रदर्शित झाली. त्याआधी ९ सप्टेंबरला ट्रेलर रीलिज झाला. पण, ९ स्पटेंबर ते १५ स्पटेंबरदरम्यान मोठी लढाई झाली. या वेबसिरीजची स्क्रीप्ट आपली आहे, असा दावा करत नवीगनस् स्टुडिओ प्रा. लि. यांनी कॉपीराइटच्या मुद्यावर हायकोर्टात धाव घेतली. समीर खांडेकरवर चित्रपटाची कथा चोरल्याचा आरोप केला. पण, समीर खांडेकरने आपण काहीही चोरलं नसून चित्रपट आणि वेबसीरिज वेगळी असल्याचं कोर्टात सिद्ध केलं.
नुकतेच समीर खांडेकरने सौमित्र पोटे यांच्या मित्र म्हणे या युट्यूब चॅनेलला एक मुलाखत दिली. यावेळी "गोष्ट चोरीचे आरोप कसे झाले आणि कोर्टाची पायरी चढून हा लढा कसा जिंकला", हा सर्व प्रकार त्याने सांगितला.
मुलाखतीत समिरने सांगितलं की, "आसोवा अर्थात 'आपली सोसल वहिनी' हे यूट्यूब चॅनल आहे. त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही कॉमेडी व्हिडीओ टाकत असतो. आता आम्ही एका वेबसीरिजचा घाट घातला. 'देवाक काळजी' या नावाची एक वेब सीरिज आली आहे. या सीरिजचा ९ सप्टेंबरला ट्रेलर रीलिज केला. सगळ्यांनी ट्रेलरचं कौतुक केलं. पण, यातच मला एक मॅसेज आला. गेल्यावर्षी मी एक सिनेमा केला होता. त्या सिनेमाच्या निर्मात्याचा हा मॅसेज होता. अरे काय हे, असं कसं केलसं तु, प्रदर्शित करण्यापुर्वी तुला ही वेबसीरिज मला दाखवावी लागेल. आपल्या सिनेमाचं सगळं उचललं आहेस. यावर मी लगेच त्याला फोन केला आणि गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला".
"माझी सीरीजही कोकणावर आहे आणि तो सिनेमाही कोणावरचं आहे. त्यामुळे त्याला चोरलं असं वाटू शकतं. म्हणून मग मी त्याला म्हटलं तु आधी वेबसीरिज बघ, सरळ आरोप करु नकोस. मी त्याला वेबसीरिज पाहण्यासाठी बोलावलं. त्याने सीनेमाच्या लेखकाला आणि इपीला माझ्याकडं पाठवलं. दोघांनी संपुर्ण वेबसीरिज पाहिली. मी त्यांना सर्व दाखवलं. लेखकाने सीरिज पाहिली आणि ते काही बोलले नाहीत, तर मला वाटलं की आता गैरसमज दूर झाला. पण, यानंतर मला निर्मातीचा फोन आला. मी म्हणाली, असं करायला नको होतं. कठीण दिसतंय. मग मी म्हणालो अगं झालं ना कालच सगळं. ते बघून गेले. काही असतं तर ते म्हटले असते, हे बघ हे चोरीचं आहे. त्यांनी तर ते पाहिले आणि निघून गेले", मुलाखतीत समिरने हे सांगितलं.
मुलाखतीत पुढे तो म्हणतो, "मी सीरिज पुढे ढकलावी अशी त्यांची इच्छा होती. पण, मी म्हटलं नाही. "यार माझं १५ स्पटेंबरला रीलिज आहे आणि मी काही कुणी मोठा प्रोड्युसर नाही. माझं सर्व खिशातून आहे. बरं मी पुढे का ढकलावी, याचं कारणही नाही. समजा जर मी माघार घेतली, तर लोकांना असेच वाटले की मी चोरलंय. माझ नाव राहणार नाही. मी सिनेमा निर्मात्याला म्हटलं तु शांत हो. तुझी काळजी बरोबर आहे. तर तो म्हणे नाही सिनेमाचा आणि सीरिजचा ट्रेलर सेम आहे. मी त्याला म्हटलं, तु ट्रेलरवरुन जज करु नको. चोरले असे आरोप करु नको आणि तु सीरिज बघ. वेगळ्या माणसाला पाठवण्यापेक्षा तु सीरिज बघ. आमचं दोघांचं बोलण झालं आणि मला वाटलं की सगळं मिटलं", असं समिरने मुलाखतीत सांगितलं.
मुलाखतीत पुढे त्यानं सांगितलं की, "पण, १३ तारखेला मला मेल आला, कोर्टाची कायदेशीर नोटीस आली. मी ती वाचलं. हे पाहून मला धक्काच बसला. कोणत्याही सामान्य व्यक्तीला बसला असता. मी म्हटलं हा काय प्रकार आहे. नोटीसमध्ये सीनेमा पाडण्यासाठी मी मुद्दाम सीरिज १५ स्पटेंबरला रीलिज करतोय आणि सिनेमातील गोष्टी चोरल्यात असा आरोप होता. यावर मी माझ्या वकिल मित्राला फोन केला. त्याला नोटीसबद्दल सांगितलं. तर वकिल मित्राने मला समोपचाराने सोडवण्याचा सल्ला दिला. यावर पुन्हा सिनेमा निर्मात्याला फोन केला. "हे मला खूप त्रासदायक आहे. हे कोर्टाचं कुठे करत बसू मी. मी सर्व खिशातलं घालून वेबसीरिज करतोयं. अरे तु बघ ना लेखकाला का पाठवतोय". तर तो म्हणे, "आमची टीम तु चोरलं असं म्हणत आहेत. तु कायदेशीररित्या उत्तर दे", असे म्हणतं त्यानं फोन ठेवला".
मुलाखतीत त्याने सांगितलं की, "मग मी पुन्हा माझ्या वकिल मित्राला फोन केला. आता लढावंच लागेल म्हटलं. तो म्हणाला चल ठीक आहे. त्याने मला त्याच्या वकिल मित्रांचा नंबर दिला. त्यांच्याकडून मग मी त्यांना नोटीस पाठवली. सगळे मुद्दे काऊंटर केले. हे सगळं सुरू होतं. तर १४ स्पटेंबरला सकाळी हायकोर्टात सुनावणी लावली. तेव्हा माझी बाजू कोणीतरी मांडण गरजेचं होतं. यावेळी वकील किरण शर्मा यांनी माझी बाजू मांडली".
"किरण शर्मा हे अमराठी माणूस. त्यांना हे कोर्टात पोटतिडकीन मांडता येईल का, असा प्रश्न मला पडला. परीक्षेच्या अदल्यादिवशी जसा अभ्यास आपण करतो, तसा किरण शर्मा यांनी केसचा संपुर्ण अभ्यास केला. दुसऱ्या दिवशी ते सुनावणीला उभे राहिले. यावेळी सीनेमावाल्याचे आरोप हास्यपद होते. यावर किरण शर्मा यांनी सर्व वास्तव मांडलं. न्यायाधीशांना आम्ही वेबसीरिज पाहण्याचा आग्रह केला. त्यांनी पेनड्राईव्हमध्ये घेतली आणि त्यांनी ती खरचं पाहिली. तसेच त्यांनी चित्रपटाचं लेखनही वाचलं. न्यायाधीशांनी सीरिज पाहिल्यावर मी चोरलं नाही हे त्यांंना पटलं आणि आमच्या बाजूनं निकाल लागला". माझ्यावर झालेले आरोप चुकीचे सिद्ध झाले पण, कोणी कोर्टाचे निकाल वाचतं नाही. त्यामुळे मला माझी बाजू मांडण गरजेचं वाटलं, असे समीर खांडेकरने मुलाखतीत सांगितलं.