रस्त्याच्या कडेला थांबत मराठी अभिनेत्याने तळली गरम गरम भजी, Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 13:47 IST2023-10-06T13:46:38+5:302023-10-06T13:47:37+5:30
नुकतंच अभिनेत्याने रस्त्याच्या बाजूला थांबून चक्क भजी तळली. सोबतच त्या भजी विक्रेत्या तरुणाची आपुलकीने विचारपूसही केली.

रस्त्याच्या कडेला थांबत मराठी अभिनेत्याने तळली गरम गरम भजी, Video व्हायरल
मराठी अभिनेता संदीप पाठक (Sandeep Pathak) त्याच्या साधेपणामुळे सगळ्यांचंच मन जिंकतो. किती जरी यश मिळालं तरी आपला साधा सरळ स्वभाव सोडत नाही. संदीप पाठक त्यातल्याच अभिनेत्यांपैकी एक. त्याचं 'वऱ्हाड निघालंय लंडनला' हे नाटक जोरदार सुरु आहे. अनेक वर्षांपासून तो वेगवेगळ्या शहरात जाऊन प्रयोग करतोय. प्रवासात असताना त्याला काय काय अनुभव येतात हे सुद्धा तो शेअर करत असतो. नुकतंच अभिनेत्याने रस्त्याच्या बाजूला थांबून चक्क भजी तळली. याचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केलाय.
संदीप पाठक नाटकाच्या प्रयोगासाठी सोलापूरला निघाला होता. वाटेत त्याला गरम गरम भजी तळणारा दिसला. मग काय संदीप थांबला आणि त्याने स्वत:च भजी तळायला घेतली. सोबतच त्या भजी विक्रेत्या तरुणाची आपुलकीने विचारपूसही केली. या व्हिडिओला कॅप्शन देत संदीपने लिहिले,'प्रवासात मला प्रत्येक ठिकाणी थांबून वेगवेगळे पदार्थ खायला आवडतात. सुरडी फाटी (कळंब) जवळ आकाश नावाचा मुलगा गरम गरम भजे तळत होता, मला मोह झाला भजे तळण्याचा आणि खाण्याचा. Thank you आकाश'
संदीपचा हाच साधेपणा त्याला चाहत्यांच्या आणखी जवळ घेऊन जातो. याआधीही त्याने एकदा प्रवासात एका आजींची मदत करत तिला घरापर्यंत नेऊन सोडले होते. संदीपचा हा व्हिडिओही चाहत्यांना खूप आवडला असून त्याचं कौतुक होत आहे.