'शरद पोंक्षे कधीही काहीही विसरत नाही'; आदेश बांदेकरांसाठी अभिनेत्याची पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 01:24 PM2022-06-28T13:24:02+5:302022-06-28T13:24:35+5:30

Sharad ponkshe: कर्करोगाशी दिलेल्या या लढ्याचं वर्णन त्यांनी 'दुसरं वादळ' या पुस्तकात केलं आहे. या पुस्तकामध्येच त्यांनी अभिनेता आदेश बांदेकर यांचा उल्लेख केला असून आता सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

marathi actor sharad ponkshe thanked Aadesh Bandekar | 'शरद पोंक्षे कधीही काहीही विसरत नाही'; आदेश बांदेकरांसाठी अभिनेत्याची पोस्ट

'शरद पोंक्षे कधीही काहीही विसरत नाही'; आदेश बांदेकरांसाठी अभिनेत्याची पोस्ट

googlenewsNext

मराठी कलाविश्वातील अभ्यासू आणि प्रतिभावान अभिनेता म्हणजे शरद पोंक्षे (sharad ponkshe). उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे शरद पोंक्षे कायम आपलं मत रोखठोक, निर्भीडपणे मांडत असतात. त्यामुळे कलाविश्वापासून ते राजकीय घडामोडींवर ते बिंधास्त व्यक्त होताना दिसतात. काही काळापूर्वीच त्यांनी कर्करोगावर मात करत पुन्हा एकदा कलाविश्वात कमबॅक केलं आहे. कर्करोगाशी दिलेल्या या लढ्याचं वर्णन त्यांनी 'दुसरं वादळ' या पुस्तकात केलं आहे. या पुस्तकामध्येच त्यांनी अभिनेता आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांचा उल्लेख केला असून आता सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्यांचे आभार मानले आहेत

कलाविश्वासोबतच शरद पोंक्षे सोशल मीडियावरही कमालीचे सक्रीय आहेत. अलिकडेच त्यांनी ट्विटवर त्यांच्या पुस्तकाचं एक पान शेअर केलं. या पानावर आदेश बांदेकरांचा उल्लेख करण्यात आला आहे. तसंच या पानासह त्यांनी दिलेलं कॅप्शन लक्षवेधी ठरत आहे.  'शरद पोंक्षे कधीही काहीही विसरत नाही', असं कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिलं आहे.

काय म्हणाले शरद पोंक्षे?

"मला ८० टक्के टीबी आणि २० टक्के कॅन्सर असण्याची शक्यता जाणवते. एकही मिनिट यापुढे वाया घालवू नका. लगेच डॉक्टर शोधा. मी आणि विवेक बाहेर आलो, काहीच कळेना. आता डॉक्टर कसा शोधायचा ? आणि एकदम आदेश बांदेकरची आठवण झाली. हा असा एक जिवलग मित्र आहे की संकटसमयी त्याची आठवण येते. फक्त मलाच नाही तर अनेक कलावंतांना. त्याची खासियत ही आहे की सर्वांसाठी तो मदतीला धावून जातो. आदेशला फोन केला, तो त्याच्या कुटुंबासोबत देवदर्शनाला गेला होता. तुळजापूरच्या मंदिरात. मला म्हणाला अर्ध्या तासात फोन करतो. मी आणि विवेकने तिथेच त्याच्या फोनची वाट बघितली. ४० मिनिटानंतर त्याचा फोन आला तो सरळ उत्तर घेऊनच", असं शरद यांनी या पुस्तकात लिहिलं आहे.

पुढे ते लिहितात, "मला म्हणाला, "दादरला हिंदू कॉलनीत डॉ. श्रीखंडेंचं क्लिनीक आहे तिथे त्यांचे जावई डॉ. आनंद नांदे आहेत त्यांना भेट." लगेच उद्या दुपारी १२ ची वेळी घेतलीये, तू जाऊन भेट. इतक्या तत्परतेने आदेशने कुटुंबासोबत देवदर्शन करत असूनही डॉक्टर नांदेसोबत बोलून माझी भेट ठरवली. असा हा आदेश, सहृदयी माणूस !"

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच शरद पोंक्षे यांचं 'दुसरं वादळ' हे पुस्तक प्रकाशित झालं. या पुस्तकात त्यांनी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या मदतीचा उल्लेख केला होता. परंतु, शरद पोंक्षे यांची ही पोस्ट पाहून आदेश बांदेकर नाराज झाले आणि त्यांच्यात ट्विटर वॉर सुरु झाला. शरद पोंक्षे यांना आदेश व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या मदतीचा विसर पडला असा समज आदेश बांदेकरांचा झाला होता. म्हणूनच, हा गैरसमज दूर करण्यासाठी शरद पोंक्षे यांनी पुस्तकाचं पान शेअर करत आपल्या पुस्तकात आदेश बांदेकरच्या मदतीचा उल्लेख केल्याचं सांगितलं.
 

Web Title: marathi actor sharad ponkshe thanked Aadesh Bandekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.