Shashank Ketkar : चला चला विरोध करा..., ‘हर घर तिरंगा’ मोहिमेवर शशांक केतकरची उपहासात्मक पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2022 02:46 PM2022-08-05T14:46:41+5:302022-08-05T14:51:13+5:30
Shashank Ketkar : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव उपक्रमाअंतर्गत 9 ऑगस्टपासून ‘हर घर तिरंगा’ ही मोहिमही राबवण्यात येत आहे. पण अनेकांनी या मोहिमेला विरोध केला आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाली आहे आणि यानिमित्ताने देशभरात केंद्र सरकारच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रम राबवण्यात येत आहेत. या अंतर्गत येत्या 13 ते 15 ऑगस्ट यादरम्यान आपल्या घरांवर राष्ट्रध्वज फडकवण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील समस्त जनतेला केलं आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव उपक्रमाअंतर्गत 9 ऑगस्टपासून ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Tiranga) ही मोहिमही राबवण्यात येत आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंटच्या प्रोफाईलमध्ये तिरंग्याचे छायाचित्र ठेवावं, असं आवाहनही पंतप्रधानांनी केलं आहे. या मोहिमेसाठी एक खास गीतही प्रदर्शित करण्यात आलं आहे. पण मोदींनी ही मोहिम जाहिर करताच अनेकांनी या मोहिमेला विरोध केला आहे. सोशल मीडियावरही याबाबत नकारात्मक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर मराठमोळा अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) याने एक उपहासात्मक पोस्ट शेअर करत, या मोहिमेला विरोध करणाऱ्यांना शालजोडीतली लगावली आहे.
वाचा, शशांकची पोस्ट
चला चला विरोध करा...
सगळ्या बक्कळ पैसे कमावणाऱ्या celebrities ना घेऊन केलेल्या गाण्याला विरोध करा . यातून अजिबात inspire वगैरे तर होऊच नका. या अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून सुध्धा एक ऊर्जा मिळते वगैरे सगळं खोटं आहे. जुन्या पिढ्यांनी जी आत्ता पर्यंत वाट लावली, तीच देशासाठी योग्य आहे. Young, वेगळा दृष्टिकोन वगैरे काही नसतं.
भारताचा झेंडा घरो घरी असावा.... ही positive भावना १४० कोटी लोकांच्या मनात रुजावी या साठी आपल्या सरकारला campaign करावं लागतं !???
जगातल्या प्रत्येक देशात काही ना काही problems आहेत, पण जेव्हा जगासमोर मांडलेल्या त्यांच्या प्रतिमेचा प्रश्न येतो तेव्हा ते सगळे कट्टर होतात. देशासाठी पेटून उठतात. आपण केव्हा कट्टर भारतीय होणार ? आपण केव्हा आपल्या देशाचा विचार करणार ?