"सेटपासून ते मोठ्या पडद्यावर...", मराठमोळ्या अभिनेत्याने सांगितला 'छावा'मध्ये काम करण्याचा अविस्मरणीय अनुभव
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 12:49 IST2025-02-16T12:46:03+5:302025-02-16T12:49:10+5:30
लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' हा चित्रपट १४ फेब्रुवारीला जगभरात प्रदर्शित झाला.

"सेटपासून ते मोठ्या पडद्यावर...", मराठमोळ्या अभिनेत्याने सांगितला 'छावा'मध्ये काम करण्याचा अविस्मरणीय अनुभव
Shubhanakar Ekbote: लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' हा चित्रपट १४ फेब्रुवारीला जगभरात प्रदर्शित झाला. सध्या बॉक्स ऑफिसवर 'छावा' चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal), रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna)आणि अक्षय खन्ना यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर बोलबाला पाहायला मिळतोय. दरम्यान, या मल्टिस्टारर चित्रपटात अनेक मराठी कलाकार देखील झळकले आहेत. संतोष जुवेकर, शुभंकर एकबोटे, सुव्रत जोशी, सारंग साठ्ये, किरण करमरकर तसेच दमयंती पाटकर असे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसत आहेत. त्यांच्या अभिनयाचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. अशातच नुकतीच अभिनेता शुभंकर एकबोटेने (Shubhanakar Ekbote) 'छावा'साठी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे.
शुभंकर एकबोटेने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत 'छावा' सिनेमात काम करण्याचा त्याचा अनुभव सांगितला आहे. दरम्यान, 'छावा'मध्ये शुंभंकरने सरसेनापती धनाजी जाधव यांची भूमिका साकारली आहे. अशातच सोशल मीडियावरील या पोस्टमध्ये आपला अविस्मरणीय अनुभव शेअर करताना त्याने लिहिलंय की, "सेटपासून ते मोठ्या पडद्यावर 'छावा' आता जगभरात आपली छाप पाडण्यासाठी सज्ज आहे. या प्रवासाचा मला एक भाग होता आलं याचा मला प्रचंड अभिमान आहे. शिवाय या संपूर्ण प्रवासामध्ये प्रत्येक क्षणी आपलं अमूल्य मार्गदर्शन आणि विश्वासाबद्दल दाखवल्याबद्दल लक्ष्मण उतेकर सर तुमचे मनापासून आभार...!"
पुढे अभिनेत्याने लिहिलंय, "२०१४ मध्ये जेव्हा मी पहिल्यांदा 'मसान' पाहिला तेव्हापासून मी अष्टपैलू, पॉवर हाऊस असलेल्या विकी कौशलसोबत काम करण्याची इच्छा होती आणि ती आज या निमित्तानेपूर्ण झाली. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विकी कौशल आमचे राजे...! एक माणूस म्हणून देखील तो तितकाच चांगला आहे. तुमच्यासोबत काम करण्याचा हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहणार. मानाचा मुजरा राजे...! आणि मला तुमच्यासोबत स्क्रीन पुन्हा पुन्हा शेअर करायल कायम आवडेल. तसेच ज्येष्ठ अभिनेते आशुतोष राणा, प्रदीप सर, विनीत भाई, संतोष दादा ज्यांना मी लहानपणापासून पडद्यावर पाहत आलो आहे. त्यांच्याबरोबर हे खास क्षण शेअर करण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी त्यांचे शब्दांत आभार देखील मानू शकत नाही. त्याचबरोबर भार्गव शेलार सर आणि परवेज शेख सरांच्या संपूर्ण टीमने मला पडद्यावर लढण्यास सक्षम बनवलं यासाठी त्यांचे खूप खूप आभार. याशिवाय माझे मित्र अंकित भाऊ, आशिष पतोडे भाई, बालाजी सर, सारंग साठे, सुव्रत जोशी अशा चांगल्या लोकांचा सहवास मला लाभला यासाठी मी त्यांचासुद्धा आभारी आहे. दिनेश विजन सर, मॅडडॉक फिल्म्स आणि संपूर्ण छावा टीमचे मनापासून आभार...!"
प्रेक्षकांना केलं आवाहन
"'छावा' मधील 'सरसेनापती धनाजी जाधव' ही व्यक्तिरेखा साकारण्याची मला संधी दिली हे माझं भाग्य आहे. मराठा गर्जना अनुभवण्यासाठी तसेच अविस्मरणीय शौर्याची कहाणी पाहण्यासाठी थिएटरमध्ये हा चित्रपट जरूर पाहा. हर हर महादेव...!", अशा आशयाची पोस्ट अभिनेत्याने शेअर केली आहे.