"स्वत:ला भाग्यवान समजतो कारण...", शुभंकर एकबोटेने सांगितला 'छावा'तील कास्टिंगचा किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 13:46 IST2025-02-14T13:44:01+5:302025-02-14T13:46:11+5:30
बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal)आणि रश्मिका मंदाना स्टारर 'छावा' सिनेमा आज जगभरात प्रदर्शित झाला आहे.

"स्वत:ला भाग्यवान समजतो कारण...", शुभंकर एकबोटेने सांगितला 'छावा'तील कास्टिंगचा किस्सा
Shubhanakar Ekbote: बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal)आणि रश्मिका मंदाना स्टारर (Rashmika Mandanna) 'छावा' सिनेमा आज जगभरात प्रदर्शित झाला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेल्या सिनेमाबद्दल चाहत्यांमध्ये तसेच प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या चित्रपटात विकी कौशल छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत आहे तर रश्मिका मंदाना या चित्रपटात महाराणी येसुबाई यांची भूमिका साकारताना दिसतेय. त्याचबरोबर या चित्रपटात मराठी कलाकारांची फौज पाहायला मिळते. त्यापैकी एक म्हणजे दिवंगत अभिनेत्री अश्विनी एकबोटेंचा मुलगा शुभंकर एकबोटेने सुद्धा 'छावा'मध्ये महत्वाची भूमिका साकारली आहे. छावामध्ये शुभंकर सरसेनापती धनाजी जाधव यांच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये अभिनेत्याने त्याच्या या प्रवासावर भाष्य केलं आहे.
नुकतीच शुभंकरने 'लोकमत फिल्मी'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये छावा सिनेमातील कास्टिंग आणि त्यादरम्यानचे अनेक किस्से शेअर केले. या मुलाखतीमध्ये शुभंकर म्हणाला, "लक्ष्मण उतेकर सरांनी स्वप्न बघितलं होतं. ज्या स्वप्नाला आम्ही सगळेजण नकळतपणे जोडले गेलो, आणि आम्ही सगळ्यांनी मिळून ते बघितलेलं स्वप्न आहे. मी खरं सांगतो, मी स्वत;ला खूप भाग्यवान समजतो की मला त्या चित्रपटाचा भाग होता आलं, त्या पूर्ण टीमचा भाग होता आलं. मी त्यात सरसेनापती धनाजी जाधव ही भूमिका करतो आहे. शिवाय ही भूमिका मला अशा ठिकाणी करता आली जिथे ती पूर्ण जगभर ती आता पोहोचणार आहे."
पुढे अभिनेता म्हणाला, "खरं सांगायचं झालं तर, खूप वेगळ्या स्केलवरती गोष्टी होत होत्या. मला आठवतंय, आठ महिन्यांपासून ट्रेनिंग सुरु होतं. त्यावेळी दिलेली पहिली ऑडिशन मला आठवते. त्या ऑडिशनसाठी केलेला तयारी मला आठवते. मी कॉलेजमध्ये असताना छावा कादंबरी वाचली होती. त्यानंतर बराच काळ गेला होता. त्यामुळे सराव करण्यासाठी मी त्याची ऑडिओ बुक दोन दिवसात ऐकली. कारण मला ऑडिशनला उभं राहायचं होतं."
अभिनेत्याने सांगितला ट्रेनिंगचा किस्सा
"मी ऑडिशन एका वेगळ्या भूमिकेसाठी दिलं आणि एका वेगळ्याच भूमिकेसाठी माझी निवड झाली. मग फोटोशूट झालं लूक्स ठरले आणि मग हॉर्स रायडिंग, तलवारबाजी यांचं ट्रेनिंग देण्यात आलं. त्या ट्रेनिंगच्या काळात कळत होतं की हे साध काम नाही. याच्यासाठी खूप मेहनत आहे. हे एका रात्रीत येणार गोष्टी नाही आहे. याच्यासाठी रोज आपल्याला तेच करावं लागेल तेव्हा कुठे ते स्क्रीनवर चांगलं दिसेल. म्हणजे त्याच्या पलीकडे आपण जाऊ नाही शकत तर ते करताना असं जाणवलं की जर हे इतकं कठीण वाटतंय मेहनतीचं वाटतंय तर खरे खरे जे योद्धे होते जे आपले मराठी मावळे होते सरदार होते ते काय म्हणजे काय रक्ताचे बनले असतील ते काय मासाचे बनले असतील असं वाटत होतं." असा खुलासा अभिनेत्याने या मुलाखतीमध्ये केला.