"मला वडील नको होते, पण...", आईच्या दुसऱ्या लग्नाबाबत सिद्धार्थचं वक्तव्य, म्हणाला, "लग्नानंतर १५ दिवस तिचा चेहरा..."
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 11:48 AM2023-11-23T11:48:28+5:302023-11-23T11:49:03+5:30
"माझ्या आईला पार्टनर मिळाला, ती खूश आहे", सिद्धार्थ चांदेकरचं आईच्या दुसऱ्या लग्नाबाबत वक्तव्य
सिद्धार्थ चांदेकर हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. मालिका आणि चित्रपटांत काम करुन सिद्धार्थने सिनेसृष्टीत त्याची वेगळी ओळख निर्माण केली. सध्या सिद्धार्थ त्याच्या आगामी 'झिम्मा २' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सिद्धार्थ अनेक ठिकाणी मुलाखती देत आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सिद्धार्थने आईच्या दुसऱ्या लग्नाबद्दल भाष्य केलं.
काही दिवसांपूर्वीच सिद्धार्थने त्याच्या आईचं मोठ्या थाटामाटात दुसरं लग्न लावून दिलं. त्याच्या या धाडसी निर्णयाचं सर्वत्र कौतुक झालं. याबाबत सिद्धार्थने 'रेडिओ मिरची'ला दिलेल्या मुलाखतीत त्याची भूमिका मांडली. सिद्धार्थ म्हणाला, "आईच लग्न झाल्यानंतर १५ दिवस तिचा चेहरा, तिचे डोळे जे बघायला मिळाले. मला ते हवं होतं. मला बाकी काहीच नको होतं. बाकी लोक काय म्हणतील याच्याशी मला काहीच घेणं देणं नाही. त्यांना जे वाटतं ते त्यांनी बोलावं. त्यांना तो अधिकार आहे, याबाबत माझं काहीच म्हणणं नाही. पण, मला माहितीये ती बाई आज इतकी खूश आहे. जी गेले २० वर्ष नव्हती."
"आम्हाला सांभाळण्यासाठी, आमच्या करिअरसाठी त्याग करण्यात तिने गेली २० वर्ष तिचं स्वत्व बाजूला ठेवलं होतं. आधी मला आईचे दिवसातून ४ ते ५ फोन यायचे. आता मी आईला फोन करतो. ती खूश आहे. तिचा संसार ती करत आहे, मला हेच हवं होतं. मला वडील नाही मिळाले, पण माझ्या आईला लाइफ पार्टनर मिळाला. मला वडील नकोही होते. पण, माझ्या आईला पार्टनर मिळाला यातच मला आनंद आहे," असंही सिद्धार्थ पुढे म्हणाला.
दरम्यान, सिद्धार्थ 'झिम्मा २'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात तो कबीर हे पात्र साकारताना दिसणार आहे. 'झिम्मा' या सिनेमाचा हा सीक्वेल आहे. 'झिम्मा २'मध्ये सिद्धार्थबरोबर सायली संजीव, शिवानी सुर्वे, क्षिती जोग, सुहास जोशी, रिंकू राजगुरू, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. २४ नोव्हेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.