मला भरत जाधवचा भाऊ म्हणायचे! सिद्धू म्हणाला- "त्यांच्यामुळे मला सिनेमासाठी १ लाख रुपये..."
By कोमल खांबे | Updated: April 15, 2025 10:55 IST2025-04-15T10:54:22+5:302025-04-15T10:55:54+5:30
"मला भरत जाधव व्हायचंय", अभिनेत्याप्रती सिद्धार्थची भावना, म्हणाला- "त्यांनी मला..."

मला भरत जाधवचा भाऊ म्हणायचे! सिद्धू म्हणाला- "त्यांच्यामुळे मला सिनेमासाठी १ लाख रुपये..."
सिद्धार्थ जाधव हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. मोठ्या कष्टाने मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या सिद्धार्थने सिनेसृष्टीत नाव कमावलं. सिद्धार्थने भरत जाधव यांच्यासोबतही अनेक सिनेमात काम केलेलं आहे. 'जत्रा', 'साडे माडे तीन', 'फक्त लढ म्हणा', 'उलाढाल', 'शिक्षणाचा आयचा घो', 'खो-खो', 'ह्यांचा काही नेम नाही' यामधील त्यांची केमिस्ट्री प्रेक्षकांनाही आवडली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सिद्धार्थने भरत जाधव यांच्याबद्दल भाष्य केलं.
सिद्धार्थने नुकतीच 'अजब गजब' या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने भरत जाधव यांच्यासारखं होण्याची इच्छा बोलून दाखवली. भरत जाधव यांच्यासोबतच्या केमिस्ट्रीबद्दल विचारताच सिद्धार्थ म्हणाला, "सुरुवातीला मला भरत जाधवचा भाऊ म्हणायचे. प्रेक्षकांना कधी कधी नावं लक्षात नसतात. मला बघून अनेक वेळा लोक सिद्धार्थ नव्हे तर भरत जाधव म्हणायचे. पण, याचं मला कधीच वाईट वाटलं नाही. कारण, मला भरत जाधव सरांच्या नावाने बोलवलं जायचं. त्या माणसाने मला जत्रा सिनेमात खूप सपोर्ट केला. महाराष्ट्राचा सुपरस्टार त्याच्यासमोर मी एवढी मजा करायचो. ते मला म्हणायचे सिद्ध्या कर...हा पंच तुझा आहे...वाजव हा...हे सगळं सांगणारे ते आहेत".
"मला भरत जाधव व्हायचंय"
"माझा नवरा तुझी बायको सिनेमाच्या वेळी त्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं की माझा ऑडियन्स तयार होतोय. सांगलीला जेव्हा सिनेमाचं शूट सुरू होतं. तेव्हा मी गेलो नव्हतो. पण, सगळे विचारत होते सिद्धू कुठेय. तेव्हा त्यांनी मला फोन करून सांगितलं की तुझा ऑडियन्स तयार होतोय. तू डेव्हलप कर. आयुष्यात पहिल्यांदा मला १ लाख रुपये त्यांनी पेमेंट मिळवून दिलं. उलाढाल सिनेमाच्या वेळी आदित्य सरपोतदार सरांना त्यांनी सांगितलं की मला १ लाख रुपये द्या. आणि त्यांनी ते लगेच मान्यही केलं. एकदा केदार शिंदे सरांनी मला विचारलेलं की तुला कोण व्हायचंय? तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं की मला भरत जाधव व्हायचंय. त्यांच्याबरोबर काम करायला नेहमी मजा येते".