Subodh Bhave : सुबोध भावे पुन्हा एकदा ऐतिहासिक भूमिकेत, चाहते म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2023 05:12 PM2023-02-19T17:12:18+5:302023-02-19T17:13:59+5:30
Subodh Bhave : अरे तू तर ऐतिहासिक भूमिका करणार नाही म्हणाला होतास ना...?, सुबोध भावे झाला ट्रोल
सुबोध भावेच्या (Subodh Bhave) ‘हर हर महादेव’ (Har Har Mahadev) या चित्रपटावरून सुरु झालेला वाद तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहेच. माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन या चित्रपटाला विरोध केला होता. त्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी या चित्रपटाचे शो बंद पाडण्यात आले होते. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेन्द्र आव्हाड यांनीदेखील आक्रमक भूमिका घेतली होती. कोल्हापुरातील शिवभक्तांनी चित्रपटातून आक्षेपार्ह सीन वगळण्याची मागणी केली. या संपूर्ण वादाच्या पार्श्वभूमीवर यापुढे कधीही कुठल्याही बायोपिकमध्ये ऐतिहासिक भूमिका साकारणार नसल्याचं सुबोध भावेनं जाहिर करून टाकलं होतं. पण आता सुबोध पुन्हा एकदा एका ऐतिहासिक भूमिकेसाठी सज्ज झाला आहे.
आता सुबोध भावे ‘ताज : डिव्हायडेड बाय ब्लड’ या नव्या वेबसिरीजमुळं चर्चेत आहेत. त्याने एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना याची माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये सुबोध भावेनं लिहिलं की, ''लहापणापासूनच ज्याच्या गोष्टी ऐकल्या,ज्याच्या हुशारी वर प्रेम केलं त्या " बिरबल "ची व्यक्तिरेखा या आगामी वेब मालिके मध्ये साकारताना अत्यंत आनंद होतोय. लवकरच काही दिवसात 'ताज' ही वेब मालिका तुम्हाला Zee 5 वर पाहता येईल''. त्यामुळं तो या वेब सिरिज आता बिरबलाची व्यक्तिरेखा साकारणार आहे.
सुबोधने ही पोस्ट शेअर करताच, त्याच्या चाहत्यांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू केला. अर्थात काहींनी यानिमित्ताने सुबोधला ट्राेल करायची संधीही साधली. तू तर ऐतिहासिक भूमिका करणार नाही, असं बोलला होतास ना??????, अशी कमेंट एका युजरने केली आहे.
दादा तुम्ही कधीतरी म्हटले होते की काय माहित नाही पण ऐकल्यासारखे वाटतंय की तुम्ही कधी ही कोणतेही ऐतिहासिक चित्रपट करणार नाही, खरं आहे का हे ? अशी खोचक कमेंट एका युजरने केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज नाही शोभले तुम्ही, बिरबल ठीक आहे, असं एका युजरने त्याच्यासाठी लिहिलं आहे. आता काय बीरबल भावे म्हनायचं का..? अशी कमेंट एका युजरने केली आहे.
'ताज' ही वेबसीरिज ३ मार्च २०२३ रोजी झी५ वर प्रदर्शित होणार आहे. यात सुबोधसोबत नासिरुद्दीन शाह, आदिती राव हैदरी मुख्य भूमिकेत आहेत.