"वाचाळवीरांमुळे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वातावरण दुषित झालंय"; सुशांत शेलार प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ काय म्हणाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 13:11 IST2024-12-29T13:10:36+5:302024-12-29T13:11:10+5:30
मराठी अभिनेता सुशांत शेलारने प्राजक्ता माळीच्या पाठींबा देणारी पोस्ट शेअर करुन महाराष्ट्रातील वाचाळवीरांवर टीका केलीय (prajakta mali, sushant shelar)

"वाचाळवीरांमुळे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वातावरण दुषित झालंय"; सुशांत शेलार प्राजक्ता माळीच्या समर्थनार्थ काय म्हणाला?
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीने काल मुंबईत जाहीर पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत प्राजक्ताने तिच्यावर टीका करणारे राजकारणी सुरेश धस आणि करुणा मुंडे यांच्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला. "राजकारणात कलाकारांना का खेचता?" असा संतप्त सवाल करत प्राजक्ताने तिची बाजू स्पष्ट केली. मराठी इंडस्ट्रीतील अनेक कलाकार प्राजक्ताला पाठींबा देत आहेत. अशातच अभिनेता सुशांत शेलारने सोशल मीडियावर पोस्ट करुन प्राजक्ताचं समर्थन केलंय.
सुशांत शेलारची पोस्ट
सुशांत शेलार लिहितो की, "नमस्कार, कालपासून सगळ्या न्यूज चॅनल आणि सोशल मीडियावरती एका वाचाळवीरा कडून “महाराष्ट्राच्या लाडक्या अभिनेत्री प्राजक्ता माळी” यांच्या बद्दल जी खालच्या पातळीची टीका होत आहे, त्याचा मी कठोर शब्दांत निषेध करतो. अशा पद्धतीने कुठल्याही महिला कलाकाराला राजकारणात खेचून खालच्या पातळीवर टीका करणे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. अश्या काही वाचाळवीरांमुळे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वातावरण दुषित झाले आहे. त्यांना वेळीच आळा घातला पाहिजे. मी एक कलाकार म्हणून “प्राजक्ता माळी” यांच्या सोबत आहे"
सुरेश धस काय म्हणाले होते?
भाजपा आमदार सुरेश धस यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाविषयी बोलताना धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली होती. यावेळी सुरेश धस यांनी बोलताना रश्मिका मंदाना, सपना चौधरी आणि प्राजक्ता माळीचंही नाव घेतलं होतं. "प्राजक्ताताई माळी सुद्धा आमच्या परळीत येतात. परळीचा हाही एक पॅटर्न आहे,” असं वक्तव्य सुरेश धस यांनी केलं होतं. सुरेश धस यांच्या या वक्तव्यावर काल प्राजक्ता माळीने पत्रकार परिषद घेत तिची बाजू मांडली. यावेळी प्राजक्ताची आई अन् भाऊही उपस्थित होते.