Exclusive: "...अन् त्या एका क्षणात मी भारावून गेलो", सुव्रत जोशीने सांगितला 'छावा'चा अनुभव
By देवेंद्र जाधव | Updated: February 3, 2025 11:47 IST2025-02-03T11:46:37+5:302025-02-03T11:47:20+5:30
'छावा' सिनेमात मराठमोळा अभिनेता सुव्रत जोशी एका खास भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमानिमित्त सुव्रतने 'लोकमत फिल्मी'शी संवाद साधताना 'छावा'च्या सेटवरील भारावलेला अनुभव सांगितला (chhaava, suvrat joshi)

Exclusive: "...अन् त्या एका क्षणात मी भारावून गेलो", सुव्रत जोशीने सांगितला 'छावा'चा अनुभव
>> देवेंद्र जाधव
विकी कौशलच्या (vicky kaushal) आगामी 'छावा' (chhaava movie) सिनेमाची सगळ्यांनाच उत्सुकता आहे. या सिनेमाच्या टीझर, ट्रेलरनंतर प्रेक्षकांना कधी एकदा हा सिनेमा रिलीज होतोय असं झालं आहे. 'छावा' सिनेमा १४ फेब्रुवारीला रिलीज होणार आहे. या सिनेमात अनेक मराठी कलाकारही दिसणार आहेत. त्यापैकी एक कलाकार म्हणजे अभिनेता सुव्रत जोशी. यानिमित्तसुव्रत जोशीने (suvrat joshi) शूटिंगचा एकंदर अनुभव शेअर केला आहे. 'लोकमत फिल्मी'शी त्याने मनमोकळा संवाद साधला.
'छावा'मध्ये तू कोणती भूमिका साकारत आहेस?
छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्याचा पट मोठा आहे. त्यामुळे सिनेमात बरीच पात्र दिसणार आहेत. छत्रपती संभाजी महाराजांची गोष्ट जगभरात पोहोचवणं महत्वाचं आहे. त्यामुळे त्यांचं आयुष्य उभं करताना इतरही बऱ्याच भूमिका समोर येतात. त्यातलीच एक माझी भूमिका आहे. मात्र मला भूमिकेबद्दल फार काही जास्त सांगता येणार नाही. ते तुम्हाला सिनेमा पाहूनच कळेल.
इतिहासात काही सुदैवी आणि काही दुर्दैवी अशा घटना घडल्या. कधीकधी दुर्दैवाने अशाही काही गोष्ट घडल्यात जेव्हा आपल्याच माणसांनी आपल्याच माणसांशी दगा केला. हे कटू सत्य असलं तरी भविष्यात ते होऊ नये म्हणून समोर आणणं आवश्यक आहे. त्यादृष्टीने एक अशीच घटना छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यात घडली होती. म्हणजे कधीकधी आपलेच लोक साथ सोडतात. त्यामुळे माझ्या भूमिकेबद्दल मी सध्या एवढीच हिंट देऊ शकतो.
मला चांगल्या ऐतिहासिक पटात काम करण्याची खूप इच्छा होती. छत्रपती संभाजी महाराज यांचं कार्य दुर्दैवाने अजून लोकांपर्यंत पोहोचलं नाही. त्यामुळे त्यापद्धतीच्या एका चित्रपटात काम करायला मिळणं ही माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. तो पट उभा करण्यासाठी खूप खर्च येतो. त्यामुळे त्यावेळचा इतिहास आपल्याला दाखवायचा असेल तर तेवढंच भक्कम प्रोडक्शन पाहिजे. मॅडॉक प्रॉडक्शनने हे काम चांगल्या पद्धतीने केलंय. मी सेटवर गेलो तेव्हा जाणवलं की, चांगल्यापैकी अभ्यास झाला आहे. त्यावेळेसच्या ऐतिहासिक गोष्टींच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला गेला आहे. वास्तू-स्थापत्यशास्त्रापासून ते भाषा अशा सर्वच गोष्टींवर काम केलं गेलं आहे.
'छावा' सिनेमाची ऑफर कशी मिळाली?
सध्या ज्या काही ऑडिशन होतात त्यात त्यांना माहित असतं की साधारण कशा पद्धतीचे नट हवेत. अर्थात मी 'छावा'साठी ऑडिशन दिली. पण माझी ऑडिशन एका वेगळ्या भूमिकेसाठी झाली. मी सध्या जी भूमिका साकारतोय ती जास्त मोठी आणि परिणामकारक भूमिका असून माझं सध्याचं व्यक्तिमत्व बघून त्यांना मला या भूमिकेसाठी घ्यावं वाटलं.
'छावा'च्या सेटवर काम करताना कसा अनुभव होता?
माझ्या अंगावर अक्षरशः काटा आला. शूटिंगच्या वेळेस आम्ही कोणीही आमचे मोबाईल सेटवर घेऊन गेलो नव्हतो. वेशभुषाही खूप चांगली होती. आम्ही सगळे त्याच वेशातच उभे राहायचो. त्यामुळे मोबाईल फोनची परवानगीही नव्हती. राज्याभिषेकाच्या सोहळ्यासाठी रायगडावरचा प्रसंग मला आठवतोय. तेव्हा अक्षरशः अंगावर काटा आला होता. कारण इतक्या चांगल्या पद्धतीने तो सीन बांधला गेला होता. कॅमेरा वगळता कोणतंही टेक्निकल डिव्हाइस नव्हतं. वर मोकळं आकाश आणि रायगडाचा पट. त्याखाली सगळे पेहरावात थांबले होते.
त्यामुळे मी एका वेगळ्या काळात गेलो होतो. आपण महाराष्ट्राच्या लोकांना अनेकदा विचारतो की, तुम्हाला काळाच्या मागे जायचं असेल तर तुम्हाला कुठल्या काळात जायला आवडेल. तर खूप मोठा वर्ग सांगेल की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या किंवा छत्रपती संभाजी महाराजांचा काळ बघायला आवडेल. मला असं वाटलं की, हे शक्य होईल न होईल पण त्या काळाची अगदी तुटपुंजी छोटीसी झलक मला मिळाली.
नदीच्या काठावर छत्रपती संभाजी महाराजांची जी शेवटची लढाई झाली होती. या लढाईत दुर्दैवाने शंभूराजे कैद झाले. त्यावेळी सगळे उन्हातान्हात राबत होते. ते दृश्य बघून त्यावेळचं जगणं आणि झगडणं किती अवघड होतं याची जाणीव झाली. त्यावेळी महाराजांना काय दिव्यातून जायला लागलं असेल, याची कल्पना आली. त्यावेळचं महाराजांचं बलिदान किती मोठं आहे, याची प्रचिती आली. औरंगजेबाने इतके प्रयत्न केले होते पण मराठ्यांनी त्याच्यासाठी काही सोप्पं ठेवलं नव्हतं.
विकी-रश्मिकाशी ऑफस्क्रीन कसा होता अनुभव?
विकीबरोबर छानच अनुभव होता. अर्थात आमच्या सेटवर गप्पा झाल्या. त्याला आत्ताची मराठी नाटकं आणि चित्रपट याबद्दल बऱ्यापैकी माहिती आहे. त्याने एकेकाळी थिएटर केलंय. आनंद तिवारी हा विकीचा पहिला दिग्दर्शक आहे तो माझाही चांगला मित्र आहे. अशा कॉमन गोष्टींवर गप्पा झाल्या. मराठी नाटक कसं वर्क होतं हे मी त्याला सांगितलं. मराठीमध्ये अजूनही किती मोठ्या प्रमाणावर नाटक होतं. महाराष्ट्रात नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्या नाटकांचे प्रयोग होतात. त्यामुळे अशा विविध विषयांवर आमच्या गप्पा व्हायच्या.
लेझिम दृश्याच्या वादावर..
मी इतकंच म्हणेन की, छत्रपती संभाजी महाराजांचं कार्य सर्वांपर्यंत पोहोचावं या चांगल्या हेतूने हा चित्रपट करण्यात आला आहे. त्याच्या आड येणारी कोणतीही गोष्ट घडू नये याची खबरदारी घेतलीय.
सध्याच्या राजकीय-सामाजिक वातावरणात ऐतिहासिक सिनेमे बनवणं किती अवघड आहे?
अर्थातच आजच्या काळात ऐतिहासिक सिनेमे बनवणं थोडंसं अवघड झालंय. पण मी उलट म्हणतो की, त्याचा वापर आपण अधिकाधिक चांगला रिसर्च करण्यामध्ये घ्यावा. हे वातावरण सकारात्मक पद्धतीने घ्यावं. आपण निगेटिव्ह कशाला व्हायचं. लोक इतकं डोळ्यात तेल घालून संवेदनशीलपणे बघत असतील तर अजून चांगला रिसर्च करावा. एखादं ऐतिहासिक सत्य समोर आलं तर ते मांडायला घाबरु नये. पण आपण जास्त खोलात जाऊन संशोधन करावं.
उद्या समजा मी एखादा ऐतिहासिक नाटक किंवा चित्रपट केला. उदाहरणार्थ 'गांधी'मध्ये मी जे पात्र करतोय त्याच्या भाषेविषयी मला थोडेसे प्रश्न होते. त्यामुळे ऑफेंड होण्यापेक्षा मी त्यांना सांगितलं. तर माझा बदल ऐकून घ्यायला आमचे मेकर्स तयार होते.
आता मी एवढंच म्हणेन की, सध्या जी परिस्थिती आहे त्याचा वापर आम्ही कलाकारांनी अधिक चांगलं संशोधन करण्यासाठी करावा. त्यातून अधिक खोल आणि ऐतिहासिकदृष्ट्या सुसंगत गोष्ट मांडता येईल यासाठी प्रयत्न करावे. आणि त्यात काही खरंच सत्य सापडलं तर ते निडरपणे सांगावं. मग त्याची किंमत पण भोगायला तयार असलं पाहिजे. पण ऐतिहासिक तथ्य त्यात असलं पाहिजे. खोटंनाटं करुन नाही चालायचं.
'छावा'मधील भव्यता गाठण्यात मराठी सिनेमा कुठे कमी पडतोय?
बजेट हे खरंच एक कारण आहे. कारण तुला रायगड उभा करायचा असेल तर तेवढी जागा तुला रिकामी करावी लागते. पण मला असं वाटतं, ऐतिहासिक काही उभं करताना भव्यदिव्यच दाखवायला का गेलं पाहिजे. आपण परदेशी सिनेमे पाहिलेत. ज्यांनी अत्यंत कमी बजेटमध्ये ऐतिहासिक सिनेमे दाखवले आहेत. पूर्वी काय लोक फक्त भव्यदिव्यच जगत होते का? फक्त लढायाच करत होते का? साध्या गोष्टी पण होत्याच ना.
प्रॉब्लेम असा आहे की, त्याची आपण कॉपी करायला गेलो नाही तर वेगळ्या पद्धतीने ऐतिहासिक गोष्टी सांगता येतील. त्यामुळे त्या काळात स्वराज्यात राहणाऱ्या सामान्य शेतकऱ्याची गोष्ट आपण सांगू शकतो. त्यातून काहीतरी वेगळं ऐतिहासिक तथ्य आणि त्यावेळचा काळ उभा राहू शकतो. ऐतिहासिक चित्रपट भव्यदिव्यच असायला पाहिजेत या विचारांचा मी नाही.
आम्ही नाटकवाले कसं करतो की, जसं नाटकाचं बजेट आहे, जो नाटकाचा विषय आहे त्या दृष्टीने नाटक तयार होतं. त्यामुळे चित्रपट बनवण्याचे असे फॉर्म आपण शोधून काढले पाहिजेत.
मी उदाहरण देतो.. परवा मला एक जण सांगत होता की, सत्यजित रेंना 'अपराजितो' सिनेमा बनवायचा होता. त्या सिनेमामध्ये खूप भव्यदिव्य अशा एका मोठ्या जमीनदाराचं लग्न दाखवायचं होतं. पण त्यांच्याकडे बजेट नव्हतं. तर त्यांनी गावातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगितलं की, तुमच्याकडे भाजी, फळं, धनधान्य जे काही असेल ते एका दिवसासाठी मला भाड्यानं द्या. आणि त्यांनी हे सर्व आणून एका मोठ्या खोलीत लावलं. आणि असा शॉट लावला की किचन आहे आणि तेवढं जेवण बनवलंय. हे सूचक होतं.
सूचकता सुद्धा पुरेशी असते कधीकधी. अशा सूचक माध्यमातूनही आपल्याला ऐतिहासिक पट उभा करता येतो. भव्यदिव्यपणा दाखवता येतो. तर त्यामध्ये कल्पकताही कुठेतरी आली पाहिजे. पैशाने पांगळं नाही झालं पाहिजे. तुम्हाला जी गोष्ट सांगायचीय त्याचा कल्पकतेने विचार केला तर नवीन काहीतरी घडेल. त्यामुळे मराठी चित्रपटांमध्ये असा कल्पकतेने विचार केला तर आपण कुठल्याही गोष्टी दाखवू शकतो.
आगामी प्रोजेक्ट्स
हंसल सरांसोबत गांधींच्या आयुष्यावर केलेला एक वेब शो आहे. मी दोन मराठी सिनेमे केलेत. ते आता कधी रिलीज होतील बघूया. त्याव्यतिरिक्त एका हिंदी चित्रपटाचं शूटिंग होऊ घातलंय नेटफ्लिक्ससाठी. आणि एका मराठी चित्रपटाचंही शूटिंग सुरु होईल. खूप गोड चित्रपट आहे. तो पण दहा दिवसात फ्लोअरवर जाईल. हृषिकेश मुखर्जींचे सिनेमे असायचे त्या धाटणीचा तो मराठी सिनेमा आहे.