'वाढते प्रदूषण बघता दिवाळीत फटाके फोडू नका' वैभव मांगलेंनी केलं आवाहन; नेटकरी भडकले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 12:36 PM2023-11-07T12:36:27+5:302023-11-07T12:38:56+5:30
सध्या दिल्लीसह महाराष्ट्रातील मुंबई, पुणे शहरांनाही प्रदूषणाची झळ बसली आहे.
सध्या देशभरात अनेक शहरांमध्ये प्रदूषणाचा सामना करावा लागतोय. त्यात आता ऐन दिवाळीत फटाक्यांमुळे प्रदुषणात वाढ होऊ शकते. यामुळे मराठी अभिनेते वैभव मांगले (Vaibhav Mangale) यांनी फटाके फोडू नका अशी कळकळीची विनंती केली आहे. त्यांनी फेसबुक पोस्ट करत हे लोकांना हे आवाहन केलं आहे.
सध्या दिल्लीसह महाराष्ट्रातील मुंबई, पुणे शहरांनाही प्रदूषणाची झळ बसली आहे.दिवाळीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. याचदरम्यान प्रदुषणाचा विचार करता न्यायालयाने रात्री फक्त ३ तासांसाठी फटाके फोडण्याची परवानगी दिली आहे. नुकतंच वैभव मांगले यांनी फेसबुक पोस्ट करत लिहिले,'कळकळीची विनंती...मित्रांनो महाराष्ट्रातील बहुतांश महानगरातील हवा कमालीची प्रदूषित आहे. कृपया फटाके फोडून ती अधिक प्रदूषित करु नका.'
वैभव मांगलेंच्या या पोस्टचं काहींनी समर्थन केलंय. तर काही नेटकऱ्यांनी मात्र त्यांना चांगलंच सुनावलंही आहे. हिंदू सण समारंभ आले की, मगच सगळं आपोआप प्रदूषण वाढायला सुरू होतं का? होळीला दहन करू नका, दिवाळीत फटाके फोडू नका मग हे करु नका आणि ते करू नका म्हणणारे उद्या म्हणतील की, दिवाळीच्या पहिल्या दिवशी पायाने कारंटे पण फोडू नका. खरंतर अशा लोकांच्या घराखालीच आधी फटाके फोडले पाहिजेत. सगळ्याचा इतका तिटकारा येतो तर, मग हिंदूंचे सण सोडून इतर लोकांच्या सणांना ही नसती थेरं नाही का तेव्हा सुचत? पब्लिक सब जानती है, उगाच काहीही उठवायचं, बवाल करत गावभर हिंडायचं बोंबलत, घाण सवयच झाली आहे.' अशी संतप्त कमेंट एकाने केली आहे.