'कलावंत व्यक्त होत नाही म्हणून...'; संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त विधानावर वैभव मांगलेची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 12:54 PM2023-07-30T12:54:05+5:302023-07-30T12:54:57+5:30
Vaibhav mangle:संभाजी भिडे याचं वक्तव्य ऐकल्यानंतर मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार त्यावर व्यक्त झाले आहेत.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे संस्थापक व प्रमुख असलेले संभाजी भिडे (Sambhaji Bhide) कायम वादग्रस्त वक्तव्य करुन चर्चेत येत असतात. अलिकडेच त्यांनी महात्मा गांधी यांच्या संदर्भात एक वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे मोठा वादंग निर्माण झाला आहे. या प्रकरणी देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण व्यक्त होत आहेत. यामध्येच अभिनेता वैभव मांगले यांनीही पोस्ट शेअर केली आहे.
संभाजी भिडे याचं वक्तव्य ऐकल्यानंतर मराठी कलाविश्वातील अनेक कलाकार त्यावर व्यक्त झाले. यात कवी, अभिनेता किशोर कदम यांनी फेसबुक एक पोस्ट शेअर करत संभाजी भिडे यांना अटक व्हायला हवी असं म्हटलं आहे. तर, अभिनेता अतुल कुलकर्णी यांनीही एक कविता पोस्ट केली आहे. विशेष म्हणजे या कलाकारांनी पोस्ट केल्यानंतर काहींनी त्यांचं कौतुक केलं आहे. तर, काहींनी त्यांना ट्रोल केलं आहे. कलाकार सोयीस्कररित्या एखाद्याची बाजू घेतात किंवा एखाद्यावर तोंडसुख घेतात, असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. लोकांच्या याच मानसिकतेविषयी वैभव मांगलेने पोस्ट शेअर केली आहे.
काय आहे वैभव मांगलेची पोस्ट?
“कलावंत व्यक्त होत नाही म्हणून बोम्ब, व्यक्त झाले तरी बोम्ब….ज्यांच्या लाभाचे ते कौतूक करणार, नाही ते बदनामी करणार. काय करायचं?” , असं वैभव मांगलेने म्हटलं आहे. विशेष म्हणजे वैभवच्या या पोस्टवरही अनेकांनी कमेंट करत त्याला ट्रोल केलं आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
महात्मा गांधी यांचं पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असल्याचं म्हटलं जातं. पण, करमचंद गांधी हे मोहनदार यांचे वडील नसून ते एक मुस्लीम जमीनदार होते. आणि, हेच त्यांचे खरी वडील आहेत, असं धक्कादायक विधान संभाजी भिडे यांनी केलं आहे. त्यानंतर मोठा वादंग निर्माण झाला आहे.