"शूटिंग सुरु होतं अन् आई गेल्याचं समजलं...", विजय पाटकर 'त्या' प्रसंगाबद्दल बोलताना भावुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 11:21 IST2025-04-02T11:19:16+5:302025-04-02T11:21:42+5:30
मराठी मनोरंजनसृष्टीतील हरहु्न्नरी अभिनेता म्हणून विजय पाटकर यांच्याकडे पाहिलं जातं.

"शूटिंग सुरु होतं अन् आई गेल्याचं समजलं...", विजय पाटकर 'त्या' प्रसंगाबद्दल बोलताना भावुक
Vijay Patkar: मराठी मनोरंजनसृष्टीतील हरहु्न्नरी अभिनेता म्हणून विजय पाटकर (Vijay Patkar) यांच्याकडे पाहिलं जातं. विनोदाचा बादशहा आणि मिमिक्री आर्टिस्ट म्हणून लोकप्रिय असणारे विजय पाटकर यांनी मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यांनी आतापर्यंत अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक अशा तिन्ही क्षेत्रात काम केलं आहे. त्यात आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये विजय पाटकर यांनी त्याच्या आयुष्यातील कठीण काळावर भाष्य केलं आहे.
नुकतीच विजय पाटकर यांनी 'सुमन म्युझिक पॉडकास्ट'मध्ये हजेरी लावली. त्यादरम्यान, त्यांनी काही मन हेलावून टाकणाऱ्या प्रसंगाविषयी सांगितलं. तेव्हा ते म्हणाले, "माझ्या मोबाईलवर रात्री पावणे बारा, बाराला मिस्डकॉल होता तो बघितला, दिग्दर्शकाला सांगितलं पाच मिनिटं दे. पाच मिनिट बाहेर गेलो आणि तसाच परत आलो. दीड वाजेपर्यंत मी शूटिंग केलं. हाजमोलाची जाहिरात शूटिंग करत होतो. कादर खान आणि मी त्यामध्ये काम करत होतो. सतीश कौशिक हे त्याचे दिग्दर्शक होते. मी सकाळी आईशी बोललो. बारा वाजता माझी आई गेली होती. मी बारा ते दीड कोणाला कळू दिलं नाही की माझी आई गेली आहे. दीडपर्यंत शूट केल्यानंतर मी निघालो."
त्या प्रसंगाबद्दल सांगताना विजय पाटकर म्हणाले, "संजीव शर्मा म्हणून दिल्लीचा दिग्दर्शक होता. तेव्हा त्यांना जाणीव झाली असावी की काहीतरी घडलं आहे. त्यानंतर त्याने मला विचारलं की काही झालं आहे का? मग मी सांगितलं की माझ्या आईचं निधन झालं. तो म्हणाला कधी? मी म्हटलं की दीड तासापूर्वी. त्यावर तो म्हणाला बोलायचं होतं. मी त्याला म्हणालो की सेट लागला आहे कादर खान वगैरे आहेत, तर मी कसा बोलणार. म्हटलं की मी जोपर्यंत सांभाळू शकत होतो, तोपर्यंत सांभाळलं." असं त्यांनी सांगितलं.