Hemant Dhome : “मी राजकारणात आलो तर सगळं...”, राजकीय प्रवेशाबद्दल काय म्हणाला मराठमोळा दिग्दर्शक हेमंत ढोमे?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2022 10:09 AM2022-11-18T10:09:40+5:302022-11-18T10:13:36+5:30
Hemant Dhome : लोकप्रिय दिग्दर्शक, अभिनेता हेमंत ढोमे राजकीय विषयावरही बिनधास्तपणे बोलतो. असा परखड मतांचा माणूस राजकारणात आला तर? असा प्रश्न तुम्हालाही पडू शकतो...
मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वांचा लाडका व लोकप्रिय दिग्दर्शक, अभिनेता हेमंत ढोमे (Hemant Dhome) त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतोच. पण त्याहीपेक्षा जास्त सोशल मीडियावरच्या पोस्टमुळे त्याची चर्चा होते. अनेकदा तो सोशल मीडियावर परखड मत मांडताना दिसतो. राजकीय विषयावरही तो तितक्यात बिनधास्तपणे बोलतो. असा परखड मतांचा माणूस राजकारणात आला तर? असा प्रश्न तुम्हालाही पडू शकतो. तर आता या प्रश्नाचं उत्तरही मिळालं आहे. खुद्द हेमंतने एका मुलाखतीत या प्रश्नाचं उत्तर दिलं.
‘हिंदुस्तान टाइम्स मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत हेमंतला नेमका हाच प्रश्न विचारण्यात आला आणि त्याने नेहमीप्रमाणे आपल्या शैलीत याचं उत्तर दिलं.
काय म्हणाला हेमंत?
तुला राजकारणात यायला आवडेल का? असा प्रश्न हेमंत ढोमेला या मुलाखतीत विचारण्यात आला. यावर तो म्हणाला, ‘नक्कीच... मला राजकारणात यायला आवडेल. तो माझ्या आवडीचा भाग आहे. पण सध्या तसं वातावरण नाहीये. मी हे सगळं प्रचंड फॉलो करत असतो. मला तुम्ही कोणताही राजकीय प्रश्न विचारा, त्याचं उत्तर माझ्याकडे आहे. पण सध्या खूप नकारात्मक वातावरण आहे. मी किंवा कुणीही एकटा माणूस सिस्टिम नावाची गोष्ट बदलवू शकत नाही. मी आलो तर सगळं साफ करून टाकेन, हा सिनेमातला डायलॉग बोलायला, ऐकायला तसा छान आहे. पण प्रत्यक्षात तसं होत नाही. आपण जिथे कुठे असू आपल्यावरही एक सिस्टिम असतेच. त्यामुळे आत्ता तरी राजकारण नाही...’
मराठी चित्रपटसृष्टीत एक प्रतिभावान दिग्दर्शक म्हणून हेमंत ढोमे याची ओळख आहे. वेगळ््या विषयाला वाहिलेले, वेगळ्या धाटणीचे सिनेमे हे त्याचं वैशिष्ट्य आहे. काही महिन्यांपूर्वी त्याचा ‘झिम्मा’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता. आता तो ‘सनी’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.