चैतू आणि चिमीच्या 'नाळ भाग २'सोबत जोडली गेली कलाकारांची नाळ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 02:28 PM2023-11-17T14:28:04+5:302023-11-17T14:39:20+5:30

सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित 'नाळ भाग २'ची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. दिवाळीत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

marathi actors impress by watching Nagraj manjule directed naal 2 cinema | चैतू आणि चिमीच्या 'नाळ भाग २'सोबत जोडली गेली कलाकारांची नाळ

चैतू आणि चिमीच्या 'नाळ भाग २'सोबत जोडली गेली कलाकारांची नाळ

सध्या सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित 'नाळ भाग २'ची सर्वत्र जोरदार चर्चा सुरु आहे. दिवाळीत प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतानाच आता मराठी कलाकारांचीही या चित्रपटासोबत नाळ जोडली जात आहे. अनेक कलाकार आपल्या सोशल मीडियावरून या चित्रपटाचे भरभरून कौतुक करत आहेत. महेश मांजरेकर, विजू माने, आदिनाथ कोठारे, स्मिता तांबे यांच्यासह अनेक कलाकारांनी या चित्रपटाबद्दल प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

महेश मांजरेकर यांनी आपल्या सोशल मीडियावर खास व्हिडीओ शेअर केला आहे. ''अप्रतिम सिनेमा आहनाळ . अभिमान वाटला, की मराठीत असा चित्रपट यावा. 'नाळ भाग २' हा सिनेमा देशात सगळ्यांनी बघायला पाहिजे. यात तीन मुलांची कामे आहेत. अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये या चित्रपटाला नामांकने मिळतील. विशेषतः या चित्रपटातील चिमीची भूमिका साकारणाऱ्या त्या चिमुकलीला. मी सांगेन तिचे नामांकन सर्वोत्कृष्ट बालकलाकारमध्ये न घेता 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री'मध्ये घ्या. मराठी चित्रपट काहीतरी वेगळे देण्याचा नेहमीच प्रयत्न करतात. अतिशय सुंदर चित्रपट आहे. सर्वानी हा चित्रपट नक्की पाहा.'' असे कौतुक करत हा चित्रपट पाहाण्याचे आवाहनही महेश मांजरेकर यांनी केले आहे. तर दिग्दर्शक विजू माने म्हणतात, ''सुधाकर रेड्डी यंकट्टी यांनी लेखणीसहित कॅमेऱ्यानेही चित्रपट सुंदर रेखाटला आहे. पात्रांच्या रचना आणि त्यांच्या एकमेकांशी असलेला प्रतिकात्मक संबंध हा अगदी सामान्य प्रेक्षकांनाही कळणारा आहे. कुठलाही अविर्भाव नसलेला हा अत्यंत नैसर्गिक आणि निरागस सिनेमा निखळ आनंद देऊन जातो.'' 

 ''प्रत्येक फ्रेम काहीतरी सांगतेय. शब्दांपेक्षा दृष्टिक्षेपातून दाखवण्याचा उत्तम प्रयत्न  केला आहे. बघता बघता आपसूकच कंठ दाटून येतो. अप्रतिम सिनेमा.''अशी प्रतिक्रिया आदिनाथ कोठारे याने दिली आहे. तर स्मिता तांबे म्हणते, '' एक अत्यंत अप्रतिम अनुभव आहे. भावाबहिणीने, संपूर्ण कुटुंबाने एकत्र जाऊन पाहावा, असा हा सिनेमा आहे. या चित्रपटात अनेक हळव्या भावना आहेत. एखाद्या गावाचे चुकून कॅमेरा शिरला आहे, इतका नैसर्गिक अभिनय ही पत्रे करत आहेत. सुधाकर रेड्डी यंकट्टी, नागराज मंजुळे आणि झी स्टुडिओजने एक उत्तम कलाकृती दिवाळीच्या निमित्ताने भेट दिली आहे.'' याव्यतिरिक्त प्रियदर्शन जाधव, सोनाली खरे, विजय पाटकर, जयवंत वाडकर, प्रथमेश परब आदी कलाकारांनीही 'नाळ भाग २'चे विशेष कौतुक केले आहे.

Web Title: marathi actors impress by watching Nagraj manjule directed naal 2 cinema

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.