'व्हॅनिटीने वाट लावली...' नव्या कलाकारांबद्दल बोलताना सिनिअर अभिनेत्यांनी व्यक्त केली खंत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 03:58 PM2023-10-16T15:58:02+5:302023-10-16T15:58:30+5:30
सध्याचे कलाकार कशी वागणूक देतात यावर ते स्पष्टच बोलले.
सध्या मनोरंजनसृष्टीत अनेक बदल घडत आहेत. आधीसारखी ही इंडस्ट्री राहिलेली नाही. आधुनिक तंत्रज्ञान आली, विकास झाला मात्र माणमाणसांतील संपर्क तुटला. जुन्या काळी सिनेमातील कलाकार शूटिंगदरम्यान सेटवर एकत्र गप्पा मारायचे, जेवायचे. पण आता तो काळ राहिलेला नाही. आता नवीन कलाकारांना व्हॅनिटी व्हॅनमध्येच बसायचं असतं. तिसरा माणूस आला की त्याला दुसरीकडे जायला सांगितलं जातं खंत नुकतीच मराठी अभिनेते विजय पाटकर (Vijay Patkar), जयवंत वाडकर (Jaywant Wadkar) यांनी केली आहे.
'लोकमत फिल्मी' च्या 'आपली यारी' कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर, विजय पाटकर, तुषार दळवी यांनी हजेरी लावली. त्यांनी त्यांच्या मैत्रीचे किस्से सांगितले. इंडस्ट्रीतील मैत्रीविषयीही ते बरंच बोलले. सध्याचे कलाकार कशी वागणूक देतात यावरही चे स्पष्टच बोलले. विजय पाटकर म्हणाले,'तेव्हाच्या काळी व्हॅनिटी नव्हती म्हणून आमच्यात चांगला बाँड होता. आता व्हॅनिटी आली आणि त्यामुळे सगळी वाट लागली. आधी अनिल कपूर, जॉनी लिव्हर सारखे सुपरस्टार सिनिअर अभिनेते त्यांनीही झाडाखाली कपडे बदलले आहेत'.
ते पुढे म्हणाले,'एका मराठी सिनेमात मोहन जोशी, अरुण नलावडे, मंगेश देसाई आम्ही एकत्र होतो. सयाजी शिंदेही आमच्याबरोबर होते. मोहन जोशींसारखे सिनिअर अभिनेतेही व्हॅनिटी सोडून आमच्याबरोबर बसले होते. सध्याच्या कलाकारांचं ठीक आहे त्यांना सगळं मिळत आहे त्यामुळे ते लाभ घेणारच पण माणसात या.'
तर जयवंत वाडकर म्हणाले, 'दोन जण बसलेले असताना जर तिसरा आला तर हा प्रोडक्शनला सांगून याला दुसरीकडे बसवा इथे नाही असा निरोप देतो.'
'आपली यारी' कार्यक्रमात तिघांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. तसंच लक्ष्मीकांत बेर्डे यांचीही त्यांनी आठवण काढली. मैत्री टिकवून कशी ठेवायची हे लक्ष्मीकांत बेर्डेंनीच शिकवलं असंही ते म्हणाले.