नलू मावशी आता ऐतिहासिक भूमिकेत?; 'या' चित्रपटात साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2021 13:03 IST2021-12-22T12:57:49+5:302021-12-22T13:03:12+5:30
Deepti ketkar: दिप्तीची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला हा चित्रपट कोणता असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

नलू मावशी आता ऐतिहासिक भूमिकेत?; 'या' चित्रपटात साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका
'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे दिप्ती केतकर. या मालिकेमध्ये दिप्तीने नलू मावशी म्हणजेच स्वीटूच्या आईची भूमिका साकारली आहे. दिप्तीच्या अभिनयातील साधेपणा आणि सहजपणा यामुळे तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. विशेष म्हणजे 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेत एका गृहिणीची भूमिका साकारणारी दिप्ती लवकरच एका करारी व्यक्तीमत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेनंतर लवकरच तिची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
सध्या सोशल मीडियावर दिप्तीचा एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो एका चित्रपटाच्या सेटवरचा असून यात तिने पांढरी शुभ्र लाल काठ असलेली नऊवारी साडी नेसल्याचं पाहायला मिळत आहे. इतकंच नाही तर तिच्या चेहऱ्यावरील करारी भाव प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. त्यामुळेच दिप्तीची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला हा चित्रपट कोणता असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
दिप्तीचा व्हायरल होत असलेला फोटो दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या 'पावनखिंड' (Pawankhind) या चित्रपटातील असल्याचं सांगण्यात येत. सध्या या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु असून तो जानेवारीच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जात आहे.
दरम्यान, पावनखिंड या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या टीझरने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. त्यानंतर आता दिप्तीचा या चित्रपटातील फर्स्ट लूक व्हायरल झाला आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये आता कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. हा चित्रपट हिंदवी स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणार्यांपैकी एक बाजीप्रभु देशपांडे यांच्यावर आधारित असल्याचं सांगण्यात येतं. बाजीप्रभु देशपांडे यांनी 300 मावळ्यांसह सिद्धी जौहरला खिंडीत रोखलं होतं. त्यांच्या साहसाचा थरार आता 'पावनखिंड' या सिनेमातून दाखवण्यात येणार आहे.