"मला तिरडीवर झोपवत नव्हतं...", अलका कुबल यांनी सांगितला 'माहेरची साडी' सिनेमाच्या क्लायमेक्सचा प्रसंग
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 04:05 PM2024-05-17T16:05:20+5:302024-05-17T16:05:45+5:30
'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत अलका कुबल यांनी 'माहेरची साडी' सिनेमाचे किस्से सांगितले.
मराठीत असे काही मोजकेच सिनेमे आहेत ज्यांनी बॉक्स ऑफिस गाजवलं. अशाच सिनेमापैकी एक म्हणजे 'माहेरची साडी'. माहेरची साडीला तोडीस तोड आणि प्रेक्षकांना इतकं रडवणारा सिनेमा अजूनही मराठीत तरी बनलेला नाही. माहेरची साडी सिनेमा पाहिलाच नाही, असं म्हणणारं क्वचितच कोणीतरी सापडेल. सोशिक, सदान् कदा रडणारी आणि कुटुंबासाठी सर्वस्व देणाऱ्या लक्ष्मीत प्रत्येक बाई स्वत:ला पाहत होती. या सिनेमात अलका कुबल मुख्य भूमिकेत होत्या. या सिनेमाने त्यांना रातोरात स्टार केलं. 'लोकमत फिल्मी'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत अलका कुबल यांनी 'माहेरची साडी' सिनेमाचे किस्से सांगितले.
अलका कुबल यांनी 'लोकमत फिल्मी'च्य 'नो फिल्टर' शोमध्ये हजेरी लावली. या मुलाखतीत त्यांनी अभिनयातील त्यांची एन्ट्री आणि कारकीर्द याबाबत भाष्य केलं. 'माहेरची साडी' करण्याआधी अलका कुबल यांनी ३० सिनेमांत काम केलं होतं. त्यांनी चांगल्या भूमिकाही साकारल्या होत्या. पण, त्यांना माहेरची साडी सिनेमाने खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळवून दिली. या सिनेमात शेवटी लक्ष्मीचा मृत्यू झाल्याचं दाखविण्यात आलं आहे. या सीनच्या शूटिंगचा किस्सा त्यांनी सांगितला.
त्या म्हणाल्या, "सिनेमात तिरडीवर झोपण्याचा सीन होता. मी पहिल्यांदाच तसा सीन करणार होते. विजय कोंडकेंनी मला सांगितलं होतं की ३-४ तासांत हा सीन संपेल. तुला तिरडीवर झोपायचं आहे. मला तिरडीवर बांधलं होतं. मी तो सीन एन्जॉय करत होते. पण, त्यादिवशी नेमकं ढगाळ वातावरण झालं. लाईट गेल्यामुळे मग कॅमेरामॅनने सांगितलं की हा सीन उद्या करावा लागेल. दुसऱ्या दिवशी सीन सुरू झाला तेव्हा मला त्या तिरडीवर झोपवेना. त्यावर अबीर, गुलाल आदल्या दिवशी टाकलेली फूलं तशीच होती. त्यावेळी मला वाटलं की माझं मरण मी माझ्याच डोळ्यांनी बघतेय. पण, मग दुसऱ्या दिवशी तो सीन पटापट केला".