"अल्झायमरमुळे बाबा माझं नावही विसरले होते", वडिलांबद्दल बोलताना अमृता सुभाष भावुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 18:14 IST2025-02-24T18:13:37+5:302025-02-24T18:14:11+5:30
अमृताने तिच्या वडिलांना अल्झायमर (स्मृतीभंश) हा आजार झाल्याचं सांगितलं. अभिनेत्रीचे बाबा तिचं नावंही विसरले होते, असा खुलासाही अमृताने या मुलाखतीत केला.

"अल्झायमरमुळे बाबा माझं नावही विसरले होते", वडिलांबद्दल बोलताना अमृता सुभाष भावुक
अमृता सुभाष ही सिनेसृष्टीतील एक हरहुन्नरी अभिनेत्री आहे. अनेक नावाजलेल्या मालिका, सिनेमा आणि नाटक यांमध्ये काम करून ती गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलेल्या अमृताने आता निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. 'असेन मी नसेन मी' या नाटकात काम करण्याबरोबरच अमृताने या नाटकाची निर्मिती आणि दिग्दर्शनाचाही बाजूही सांभाळली आहे.
या नाटकाच्या निमित्ताने अमृताने नुकतीच आरपार या यु्ट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत अमृताने तिच्या वडिलांना अल्झायमर (स्मृतीभंश) हा आजार झाल्याचं सांगितलं. अभिनेत्रीचे बाबा तिचं नावंही विसरले होते, असा खुलासाही अमृताने या मुलाखतीत केला. वडिलांबद्दल बोलताना अमृता भावुक झाली होती. ती म्हणाली, "बाबांच्या अल्झायमर झाला होता. त्यांचं रडणं थांबायचंच नाही. शूटिंगला जायचंय...यांचं रडणं थांबवू कसं? त्यामुळे प्रश्न पडतात आणि ते खरे आहेत. मग अशा वेळी आपण काय करतो स्वत:ला प्रोत्साहित करतो. ए चल उठ असं म्हणतो. पण, नाही. एक दु:ख खरंय की माझ्या वडिलांना खूप काहीतरी त्रास होतोय. आणि तो माणूस मला ओळखत नाहीये. माझे वडील मला ओळखत नाहीयेत. तर जाऊ दे ते विसर आणि काम कर असं नाही होऊ शकत. मला खूप रडू येणारे. की त्यांना माझं नावंही आठवत नाहीये. पण ते सावरणारं कुणीतरी असलं ना की यातनं बाहेर पडतो. आपला हात हातात धरायचा".
अमृता सुभाषच्या 'असेन मी नसेन मी' या नाटकात नीना कुळकर्णी, शुभांगी गोखले आणि अमृता यांच्या मुख्य भूमिका आहेत. हे नाटक संदेश कुलकर्णी यांनी लिहिलं असून अमृताने त्याचं दिग्दर्शन केलं आहे. सध्या अमृताच्या या नाटकाला प्रेक्षकांचीही पसंती मिळत आहे.