इंडियन बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये येण्याचा मान पटकावला या मराठमोळ्या अभिनेत्रीने
By अजय परचुरे | Published: June 10, 2019 01:24 PM2019-06-10T13:24:38+5:302019-06-10T13:26:21+5:30
अनन्या या नाटकातील भूमिकेसाठी आत्तापर्यंत ऋतुजाला तब्बल १२ पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
प्रताप फड लिखित-दिग्दर्शित अनन्या नाटक गेले दीड वर्ष मराठी रंगभूमीवर तुफान लोकप्रिय होत आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्वताचं आयुष्य बदलणाऱ्या अनन्याचं काम अभिनेत्री ऋतुजा बागवे तितक्याच तन्मयतेने करते. अनन्या या नाटकातील भूमिकेसाठी आत्तापर्यंत ऋतुजाला तब्बल १२ पुरस्कार प्राप्त झाले आहेत. याच १२ पुरस्काराची दखल आता इंडियन बुक ऑफ रेकॉर्डसनेही घेतली आहे. इंडियन बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये मोस्ट अॅवॉर्डस फॉर अ परफॉर्मन्स इन द इयर या अंतर्गत ऋतुजाच्या नावाची घोषणा इंडियन बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये करण्यात आली आहे. तसा ईमेलही ऋतुजा बागवेला करण्यात आला आहे.
ऋतुजाने केलेल्या अनन्याच्या भूूमिकेचं अनेक मान्यवरांनीही कौतुक केलं आहे.या दीड वर्षात तिला जे १२ पुरस्कार प्राप्त झाले आहेत त्यात लोकमतच्या लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या मानाच्या पुरस्काराचाही समावेश आहे. इंडियन बुक ऑफ रेकॉर्डसने मिळालेल्या या १२ पुरस्कारांचा विचार करून ऋतुजा बागवेचा या मानाच्या सन्मानासाठी विचार केला आहे. आणि तशी पोचपावतीही तिला देण्यात आली आहे.
अनन्याचे प्रयोेग सध्या अमेरिकत सुरू आहेत. तिथे जवळपास १ महिन्याचा नाटकाचा दौरा आहे. त्यानंतर मुंबईत परतल्यावर अनन्या नाटकाचा २५० वा प्रयोग साजरा केला जाणार आहे. अनन्या नाटक जेव्हापासून सुरू झालं तेव्हापासून हे नाटक पाहून रंगभूमी,सिनेसृष्टीतील अनेक मान्यवरांनी तिच्या भूमिकेचं भरभरून कौतुक केलं. पुण्यात अनन्याच्या प्रयोगाला दस्तुरखुद्द नटसम्राट डॉ.श्रीराम लागू यांची उपस्थिती होती. त्यांनी नाटक पाहून ऋतुजाच्या कामाचं मनापासून कौतुक केलं होतं. हे मान्यवरांचं कौतुक,वर्षभरातील १२ पुरस्कार आणि इंडियन बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये येण़्याचा मान मिळाल्याने ऋतुजा बागवे सध्या खूप खुषीत आहे.