"पावसामुळे सेट भिजला अन् निर्मात्यांचे पैसे...", 'तानी' चित्रपटाबद्दल केतकी माटेगावकर काय म्हणाली?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 16:53 IST2025-02-28T16:51:11+5:302025-02-28T16:53:14+5:30
केतकी माटेगावर ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.

"पावसामुळे सेट भिजला अन् निर्मात्यांचे पैसे...", 'तानी' चित्रपटाबद्दल केतकी माटेगावकर काय म्हणाली?
Ketaki Mategaonkar: केतकी माटेगावर (Ketaki Mategaonkar) ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'शाळा', 'काकस्पर्श', तसेच 'टाईमपास' या चित्रपटांच्या माध्यमातून ती घराघरात पोहोचली. तिच्या अभिनयासह गाण्याचेही सर्वजण चाहते झाले. गायिका असण्याबरोबरच केतकी एक उत्तम अभिनेत्रीसुद्धा आहे. सध्या केतकी एका मुलाखतीमध्ये केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. या मुलाखतीमध्ये तिने 'तानी' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचे काही किस्से सांगितले.
अभिनेत्री केतकी माटेगावकरने कांचन अधिकारी यांच्या 'बातों बातों में' या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. त्यादरम्यान, अभिनेत्रीने तानी चित्रपटाबद्दल काही आठवणी सांगितल्या. त्यावेळी मुलाखतीमध्ये केतकी म्हणाली, "तानी' सिनेमा जेव्हा माझ्याकडे आला तेव्हा जे नाही व्हायला पाहिजे ते झालं होतं. म्हणजे सेटवरून निर्मात्यांचे पैसे चोरीला गेले. त्याच्यानंतर सेट उडून गेला. फुटाळा तलावाच्या इथे तो सेट होता. शिवाय अर्धा सेट पावसामुळे भिजला. या चित्रपटात जवळपास ६० टक्के सीन्स रात्री करायचे होते. ही त्यांची पहिली फिल्म होती. तो चित्रपट करताना खूप काही घडलं होतं."
पुढे केतकीने सांगितलं, "तानी'चं शूट करुन आले मग त्यानंतर त्यांचा फोन आला आणि जे काही घडलं ते त्यांनी सांगितलं. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी त्यांना सपोर्ट करायचं ठरवलं. मला आठवतं त्यावेळी सलग तीन दिवस मी शूट केलं होतं, एक मिनिट सुद्धा मी झोपले नव्हते. ते शूटिंग खूप अवघड होतं. शिवाय दुर्दैवाने त्या चित्रपटाला थिएटर्स मिळाले नाही. पण, 'टाईमपास' चित्रपट रिलीज झाल्यानंतर 'तानी' टीव्हीवर दाखवण्यात आला. त्यामुळे 'तानी'चा एक वेगळाच चाहतावर्ग निर्माण झाला. 'तानी' गावागावात पोहोचली." असा खुलासा अभिनेत्रीने केला.