"भारत महासत्ता होणार असेल तर..", केतकी माटेगावकरचं पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री शिंदेंना खास आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2024 13:07 IST2024-03-23T13:07:21+5:302024-03-23T13:07:50+5:30
अभिनेत्री- गायिका केतकी माटेगावकरने खास पोस्ट लिहून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि पंतप्रधान मोदींना एक खास आवाहन केलंय. काय म्हणाली केतकी वाचा

"भारत महासत्ता होणार असेल तर..", केतकी माटेगावकरचं पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री शिंदेंना खास आवाहन
'शाळा', 'टाईमपास' फेम अभिनेत्री म्हणजे केतकी माटेगावकर. केतकी अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहेच याशिवाय गायिका म्हणूनही ती लोकप्रिय आहे. केतकी सोशल मीडियावर विविध सामाजिक विषयांवर पोस्ट शेअर करत असते. केतकीने सोशल मीडियावर अशीच एक पोस्ट केलीय. यात तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक खास आवाहन केलंय.
केतकी एक फोटो पोस्ट करुन लिहीते, "या फोटोत तुम्ही काय पाहताय? निसर्गाचं सौंदर्य. जेव्हा प्रगती पाहते तेव्हा मला अभिमान वाटतो. पण हीच प्रगती करताना जेव्हा आपण निसर्गाशी तडजोड करतो तेव्हा मला वाईट वाटतं. मी स्वतः एका टॉवरमध्ये राहते. मी जेव्हा खिडकीबाहेर पाहते तेव्हा मला एकही झाड न दिसता कॉंक्रीटचं जंगल दिसतं. तेव्हा मला ओशाळल्यासारखं होतं. आपण एकत्र मिळून यासाठी काहीतरी करुया का?
केतकी पुढे लिहीते, "उद्या जेव्हा मुलांना कंटाळा येईल आणि ते विचारतील की आम्हाला कुठेतरी घेऊन जा तेव्हा आपण त्यांना कुठे घेऊन जाणार. मॉल? आर्केड? आपल्या सर्वांंना इथे जायला आवडतं. पण यापेक्षा आपल्या आसपास असणाऱ्या पंचमहाभूतांसाठी मुलं कशी जोडून घेणार? माझं स्वप्न आहे की आपला भारत देश निसर्गरम्य व्हावा. आपण भारताला पुढच्या काळात महासत्ता म्हणून बघत असू तर आपण नैसर्गिकदृष्ट्या सुद्धा समृद्ध असले पाहिजे. भारत एक कृषीप्रधान देश ! आपण सर्व मिळून भारताला निसर्गरम्य बनवण्यासाठी पुढाकार घेऊ. मी यात सहभागी होतेय? अन् तुम्ही?"