Video : आम्ही एकत्र शॉपिंगला गेलोच तर..., क्रांती रेडकरने सांगितला समीर वानखडेंचा भन्नाट किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 11:22 AM2022-03-23T11:22:16+5:302022-03-23T11:23:13+5:30
Kranti Redkar Reel : क्रांतीची पोस्ट आहे ती तिच्या नवरोबाविषयीची. या पोस्टमध्ये तिने शॉपिंगदरम्यानचा नवरोबासोबतचा अनुभव सांगितला आहे.
सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असलेली अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) हिचा एक रील सध्या चांगलाच चर्चेत आहे. होय, क्रांतीने शेअर केलेला हा रिल सध्या तुफान व्हायरल होतोय. क्रांतीची पोस्ट आहे ती तिच्या नवरोबाविषयीची. या पोस्टमध्ये तिने शॉपिंगदरम्यानचा नवरोबासोबतचा अनुभव सांगितला आहे. शॉपिंग करतेवेळी पती समीर वानखेडे (Sameer Wankhede) कसे वागतात, त्यांचा मूड कसा असतो? हे तिने मजेशीर अंदाजात सांगितलं आहे.
क्रांतीने इन्स्टावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती म्हणते, ‘ मी एका मॉलमध्ये गेले होते. तिथे एक नवरा चक्क बायकोसोबत तिची चप्पल खरेदी करण्यासाठी आला होता. खरं तर ते बघून मला एक बारीक हार्टअटॅक आला. बेबी तुला ही चप्पल चांगली दिसेल का? हा रंग तुला मस्त दिसेल,.. असा क्रिमकलर आहे का तुझ्याकडे... जरा चालून दाखव... असं तो तिला म्हणत होतात. कोण असतात ही माणसं? असा प्रश्न त्यांना पाहून मला पडला. कारण आमच्याकडे आम्ही एकत्र शॉपिंगला गेलोच तर आम्हा दोघांना लागणारी वस्तू म्हणजेच एखादी चादर जरी घ्यायची असेल तरी समीर खरेदीत फार रस घेत नाहीत. सगळं सेमच तर आहे...कसला कलर? तुला जे हवं ते घे... चल लवकर आवर... असं ते म्हणतात.... आणि हा सगळा घडलेला प्रकार मी माझ्या बाबांना सांगितल्यावर त्यांची प्रतिक्रिया तरी काय? तर ‘अंग वेडे तो तिचा नवरा नसेल, बॉयफ्रेंड असेल. लग्नानंतर असं काहीही नसतं..., असं बाबा मला म्हणतात.
या व्हिडीओला तिने भन्नाट कॅप्शन दिलं आहे. ‘ मला खात्री आहे की,टाईप 1 चे नवरे असतात, मला झेपला नसता ही गोष्ट वेगळी. पण पपांच्या ब्रह्मज्ञानाचं काय करुया. तुमचा कोणता आहे टाइप 1 की टाइप 2? असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे. तिचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. अनेक महिलांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.