'ज्यांची लायकी नाही ते...'; समीर वानखेडेंना ट्रोल करणाऱ्यांना क्रांतीने फटकारलं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 12:22 PM2023-08-21T12:22:29+5:302023-08-21T12:26:09+5:30
kranti redkar: अभिनेत्री अमृता राव आणि तिचा पती आरजे अनमोल यांच्या चॅट शोमध्ये अलिकडेच क्रांती आणि समीर वानखेडे यांनी हजेरी लावली होती.
गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री क्रांती रेडकर सातत्याने चर्चेत येत आहे. एकेकाळी अभिनयकौशल्यामुळे चर्चेत येणारी क्रांती सध्या तिच्या वैयक्तिक जीवनामुळे चर्चेत येत आहे. मध्यंतरी आर्यन खान ड्रग्स प्रकरणी समीर वानखेडे रातोरात प्रकाशझोतात आले. या प्रकरणी अनेकांनी त्यांच्यावर टीकास्त्र डागलं. काहींनी त्यांच्यावर लाच घेतल्याचा आरोपही केला. या सगळ्या परिस्थितीमध्ये क्रांती त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी होती. अलिकडेच क्रांतीने पती समीर वानखेडे यांच्यासोबत पहिल्यांदाच एकत्र मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने त्यांच्या नात्याविषयी, एकमेकांच्या करिअरविषयी भाष्य केलं. यात खासकरुन समीर यांना ट्रोल करणाऱ्यांना तिने थेट फटकारलं आहे.
अभिनेत्री अमृता राव आणि तिचा पती आरजे अनमोल यांच्या चॅट शोमध्ये अलिकडेच क्रांती आणि समीर वानखेडे यांनी हजेरी लावली होती. या शोमध्ये क्रांतीने समीर वानखेडे यांच्या स्वभावातील खरेपणा यावर भाष्य केलं. इतकंच नाहीतर जे समीर यांच्यावर टीका करतात त्यांची लायकी काय? असा सवालही तिने विचारला.
"ज्यावेळी आम्ही एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमाला एकत्र जातो तेव्हा अनेक जण समीर यांच्या पाया पडतात. मी स्वत: माझ्या डोळ्यांनी हे पाहिलं आहे. अनेक स्त्रिया येतात आणि सांगतात, तुमच्यामुळे माझ्या मुलाने ड्रग्जचं व्यसन सोडलं आणि तो शिकतोय. आणि, हे असं हजारो लोक बोलतात. या लोकांच्या आयुष्यात काही सकारात्मक बदल घडत असेल तर आमच्या आयुष्याकडे थोडं फार दुर्लक्ष झालं तर चालतंय की, त्याने काय फरक पडतो?", असं क्रांती म्हणाली.
पुढे ती म्हणते, "माझे दीर सुद्धा पोलिस आहेत. ते सुद्धा समीरच्या कामाविषयी बोलतता. एकदा ते घरी आले आणि मला म्हणतात, हा एकदम वेडा आहे. याला कुठे पाठवू नकोस. हा डोंगरीसारख्या भागात एकटाच घुसतो आणि टीम लीड करतो. यांच्यातला खरेपणा मला माहितीये. पण, ज्या लोकांची लायकी नाही असे लोक पण याच्या विरोधात बोलतात तेव्हा खरंच वाईट वाटतं. त्यांना काय अधिकार आहे? कोणी हक्क दिलाय? मुळात त्यांनी देशासाठी प्रथम काही तरी करावं आणि मग समीरच्या विरोधात बोलायला यावं."